खडकलाट परिसरात सावकारी फोफावली : सावकारीला कंटाळून चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न : पोलीस प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
खडकलाटसह परिसरात सावकारी व्यवसाय फोफावल्याचे दिसून येत आहे. येथील एका गरजू व्यक्तीने घेतलेल्या 10 हजार रुपयांच्या सावकारी कर्जाचे तब्बल 25 हजार रुपये व्याज भागविले. तर अन्य एकाचे 16 हजार कर्जाऊ रकमेचे 17 हजार रुपये व्याज दिले. इतके करूनही त्याने मुद्दल परत केली नसल्याने सावकारांच्या जाचाला कंटाळून कर्जदाराने आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे त्यांचे जीवन वाचले. दरम्यान या सावकारीमुळे अनेकांचे जीवन संघर्षमय होताना मानसिक नैराश्य आले आहे. याची दखल घेत पोलीस प्रशासनाने सावकारीला आळा घालावा, अशी मागणी पुढे आली आहे.
खडकलाटसह परिसरात गरजू कुटुंबीयांना हेरुन अनेकांकडून व्याजाने पैसे पुरविले जात आहेत. वाढीव व्याजाने सामान्य कुटुंबीय सदरची रक्कम फेडताना दमछाक होत आहे. अडचणीच्या वेळी सामान्य नागरिकांना पैसे मिळत आहेत. मात्र त्या मोबदल्यात मोठय़ा प्रमाणात व्याजही वसूल करण्यात येत आहे. सदरचा व्याजाचा आकडा वाढत जाताना त्याची वसुलीही तगादा लावून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. दोन टक्के, तीन टक्के नाही तर तब्बल दहा, वीस आणि तीस टक्क्यांपर्यंत व्याजाचा आकडा आहे. हे व्याज फेडण्यासाठी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिक आणि महिला तर हे व्याज फेडण्यासाठी अनेक गैरमार्गाने पैसे गोळा करण्यात गुंतले असल्याची चर्चा आहे. गावात पोलीस स्थानक कार्यरत आहे. यामुळे वादावादी, चोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे.
एकीकडे असे चित्र असले तरी दुसरीकडे सावकारीचे पेव मात्र मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे. याकडे पोलीस अधिकाऱयांनी तात्काळ लक्ष देऊन हे सावकारीचे जाळे तोडावे आणि यामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढावे. याशिवाय सावकारी व्यवसाय करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही सुज्ञ नागरिकांतून पुढे आली आहे.
चौघांचे प्राण वाचले
गावातील एका सामान्य कुटुंबीयाने आपली आर्थिक निकड काढण्यासाठी सावकारी व्यवसाय करणाऱयांकडून दहा हजार आणि अन्य एकाकडून 16 हजार रुपये घेतले होते. सदर दहा हजार रुपयांचे 25 हजार रुपये व्याज आणि 16 हजार रुपयांचे 17 हजार रुपये व्याज भरले आहे. तरीही त्याचे कर्ज शिल्लक होते. त्यामुळे सदर व्यक्तीला मुद्दल वसुलीसाठी त्रास सुरू होता. याला कंटाळून सदर व्यक्तीने आपल्या पत्नीसह दोन मुलांचे जीवन संपविण्याचा निर्णय घेताना विषप्राशन करत असतानाच एका सुज्ञ नागरिकांने वेळीच त्यांना थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. यानंतर सदर कुटुंबीय गाव सोडून गेले आहे. अशी अनेक कुटुंबीय सावकारीच्या जाळय़ात अडकून बुक्क्यांचा मार खात आहेत. याची दखल घेत पोलीस प्रशासनाने सावकारी व्यवसायाला वेळीच आळा घालावा, अशी मागणी होत आहे.









