अर्ज करण्यासाठी पंचायत कार्यालयासमोर गर्दी
प्रतिनिधी / पणजी
लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकून पडलेले परराज्यातील मजूर व तत्सम नागरिक यांना परतीचा मार्ग खुला झाल्याने शनिवारी राज्यातील विविध उपजिल्हाधिकारी तसेच पंचायत कार्यालयासमोर संबंधितांनी एकच गर्दी केली. प्राप्त माहितीनुसार राज्यात विविध ठिकाणी अडकून पडलेले परराज्यातील सुमारे 10 हजार नागरिक आपापल्या गावात परतण्यात इच्छूक आहेत. गोवा सरकारने या नागरिकांची त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने शनिवारपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी राज्यातील विविध उपजिल्हाधिकारी कार्यालयात तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर संबंधितांनी सामाजिक अंतराचे विस्मरण करून गर्दी केली.
ताळगाव येथे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या घरासमोर असलेल्या ताळगाव पंचायतीसमोर एक मोठी रांग शनिवारी लागलेली होती. यामध्ये शेकडो मजूरवर्ग सामील झाला होता व प्रत्येकाच्या हातात अर्ज होता. यावेळी पोलिसांनी देखील सुरक्षेची पाहणी केली. राज्यातून पुढील काही दिवसात 10 हजार लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचविले जाणार आहे. राज्यातील उपजिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयात शनिवारी शेकडो जणांनी अर्ज भरून सादर केले









