वारणा कापशी / वार्ताहर
कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून शाळेला सुट्टी होती. आज दहा महिने झाले मुले शाळेपासून वंचित आहेत. मुलांना ना शिक्षकांची भीती, ना शाळेची शिस्त, ना अभ्यासाचं दडपण, ना गणवेशाची सक्ती. शाळा बंद असल्यामुळे मुलांनी दहा महिने मनमुराद खेळांचा आनंद घेतला. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन क्लासेस , ऑनलाईन शिक्षणाची पद्धत सगळीकडे रूढ झाली. मात्र अखेर आता दहा महिन्यांनी शाळेची घंटा पुन्हा वाजणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक मिळून जवळ जवळ पावणेदोनशे शाळा आता सुरू होत आहेत.
देशात भारतीय बनावटीची कोरोना प्रतिबंधात्मक लस ही उपलब्ध झाली असून 16 जानेवारी पासून देशभरात लसीकरणास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये देखील लसीकरणात सुरुवात झालेली आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यामुळे शासनाने नववी, दहावी, अकरावी, बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास पालकांनीही चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आता 27 जानेवारी पासून शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवी चे वर्ग सुरू करण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे. शाळेमध्ये कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
यासाठी पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना संमती पत्र लिहून द्यावे लागत आहे. याचा अर्थ असा की मुलांना शाळेत काही झाले तरी त्याची जबाबदारी शाळेवर किंवा शासनावर राहणार नाही असाच याचा अर्थ होत आहे. काही पालक संमती पत्र लिहून देण्यास तयार होतील पण काही पालक भीतीपोटी संमती पत्र देण्यास राजी होणार नाहीत. यामुळे शाळेची घंटा वाजली असली तरी पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवणार का याकडे पाहावे लागणार आहे.
Previous Articleसातारा जिल्ह्यातील सरपंच आरक्षण सोडत २९ रोजी
Next Article कर्नाटक : राज्यात ६७४ नवीन बाधितांची नोंद









