काश्मीरमध्ये 4जी बंद : सुरक्षा यंत्रणा दक्ष
वृत्तसंस्था/ जम्मू
सीमेवर सैन्याचा कडेकोट बंदोबस्त असल्याने पाकिस्तानला दहशतवाद्यांची घुसखोरी करविणे अशक्य ठरत चालले आहे. परंतु पाकिस्तान आता वेगळय़ा प्रकारची घुसखोरी करू पाहत आहे. पाकिस्तान स्वतःच्या सीमावर्ती भागात मोबाईल टॉवर उभारत आहे. या टॉवर्सच्या सिग्नलची क्षमता वाढवून भारतात सक्रीय दहशतवादी, तस्करांना मदत पुरविण्याचा कट पाकिस्तानने रचला असल्याची शंका व्यक्त होत आहे. काश्मीरमध्ये राहून पाकिस्तानी कंपन्यांची मोबाईल सेवा वापरण्याचा यामागे कट आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या 4जी इंटरनेटवर बंदी आहे. अशा स्थितीत दहशतवाद्यांना सीमेपलिकडील म्होरक्यांशी संपर्क साधणे अवघड ठरत आहे, याचमुळे पाकच्या भागात या टॉवर्सच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. 4जी नेटवर्क बंद असल्याचे दहशतवाद्यांचे नेटवर्कही ठप्प झाले आहे. पाकिस्तान स्वतःच्या दूरसंचार यंत्रणेच्या मदतीने नव्या रणनीतीवर काम करत आहे. सीमावर्ती भागांमध्ये अनेक टॉवर उभारण्यात आल्याचे दिसून येत आहे. टॉवर उभारण्यासह जुन्या टॉवरची दुरुस्ती करून सिग्नल बळकट केले जात आहेत.









