26/11 हल्ल्याप्रकरणी प्रतिपादन : गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
दहशतवाद विरोधातील लढाईत भारतासोबत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचेही अमेरिकेकडून म्हटले गेले आहे. मुंबईमध्ये 26 नोव्हेंबर 2008 रोजी भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमेरिकेत पाकिस्तानच्या विरोधात कारवाईची मागणी करणारी निदर्शने झाली आहेत.
मुंबईवरील 26/11 हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण होत असताना दोषींना शिक्षा मिळवून देण्याची आणि सर्व पीडितांना न्याय मिळवून देण्याची प्रतिबद्धता अमेरिका पुन्हा अधोरेखित करत आहे. भारतीय भागीदारांसोबत उभे राहून दहशतवादाच्या विरोधातील लढाईकरता दृढ असल्याचे उद्गार अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या उपप्रवक्त्यान कार्ल ब्राउन यांनी काढले आहेत.
लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत 12 हल्ले घडवून आणले होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या या हल्ल्यांमध्ये 6 अमेरिकन नागरिकांसह किमान 166 जण मारले गेले होते.









