मालवण/प्रतिनिधी –
राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै २०२१ रोजी तुकडेबंदी तुकडे जोड (सुधारणा अधिनियम २०१५) ने मूळ अधिनियमात समाविष्ट केलेल्या कलम ८ ब ला अनुसरून परिपत्रक राज्यातील सर्व दुय्यम निबंधकांना जारी केले आहे. सद्यस्थितीत या परिपत्रकाचा दूरगामी परिणाम दस्त नोंदणीवर होत आहे. यामुळे अनेक दस्तांच्या नोंदण्या अडचणीत आल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सदरच्या परिपत्रकामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये निर्माण झालेल्या कायदेविषयक तांत्रिक अडचणी दूर करून सुधारित परिपत्रक काढण्याकरीता संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याच्या मागणीचे निवेदन ना.बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर उपस्थित होते.