प्रतिनिधी / कुपवाड
राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे (रा.कुपवाड) यांच्या खून प्रकरणात सध्या पाचजणांना अटक केली असली तरी पडद्यामागचे खरे सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. त्यांच्याकडून आमच्या जिविताला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय मार्फ़त सखोल चौकशी करा आणि खऱ्या सुत्रधारांना तात्काळ अटक करा, अशी मागणी रविवारी मयत दत्ता पाटोळे यांचे नातेवाईक व समर्थकांनी मोर्चाद्वारे कुपवाड पोलिसांकडे केली.
दत्ता पाटोळे यांच्या खूनप्रकरणी सखोल चौकशीच्या मागणीसाठी रविवारी सकाळी पाटोळे यांचे नातेवाईक व शेकडो समर्थकांनी कुपवाड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आणि खऱ्या सुत्रधारांना अटक करा, या मागणीला जोर धरत बराचवेळ ठाण्यासमोर ठिय्या मारला. यात पाटोळे यांच्या पत्नी व मुलेही अग्रभागी होते. यावेळी तणावग्रस्त परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मिरजेचे पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल, सहय्यक निरीक्षक नीरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेऊन संतप्त आंदोलकांना शांततेचं आवाहन करुन या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे वातावरण निवळले. यावेळी दत्ता पाटोळे यांच्या पत्नीसंह नातेवाईकांमार्फ़त पोलिस अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, कुपवाडमधील दत्तात्रय पाटोळे यांची शुक्रवारी हल्लेखोरांकडून रोहिणी कोल्ड स्टोअरेजमध्ये धारदार शस्त्राने हत्त्या झाली. या खूनप्रकरणी पाच संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु, या खून प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यांच्यापासून आमच्या कुटुंबियांच्या जिविताला धोका आहे. याप्रकरणी सीबीआयमार्फ़त सखोल चौकशी करून मोकाट सूत्रधारांचा शोध घेयन त्यांना तात्काळ अटक करा. त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनात मुख्य संशयित म्हणून संदीप पवार, सौरभ मासाळ, प्रशांत देवकर, गजानन मगदूम, बंडू वलेकर, सागर कोळेकर यांची नावे दिली असून सीबीआय मार्फत चौकशी व्हावी.
त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पाटोळे खून प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी संदीपसिंह गिल व नीरज उबाळे यांनी पाटोळे यांच्या नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावुन संवाद साधत सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलक शांत झाले. दरम्यान, कोरोना काळात सोशल डिस्टन्सचा नियम पायदळी तुडवत बराचवेळ पोलिस ठाण्यासमोर जमलेल्या महिला व पुरुषांची गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आणि कुपवाड, मिरज शहर, ग्रामीण, महात्मा गांधी, वाहतूक शाखा, दंगल नियंत्रण पथकाच्या मदतीने सर्वाना ठाण्याबाहेर हुसकावले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








