विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचे उद्गार : कोविड इस्पितळाला आहार सामग्री प्रदान
प्रतिनिधी / मडगाव
लोकशाहीत लोकशक्ती व लोकभावनांना सर्वोच्च स्थान असते. हुकूमशाही व दडपशाहीचे राज्य जास्त काळ टिकत नाही. गोमंतकीयांनी तसेच उर्वरित देशाने व संपूर्ण जगातील लोकांनी हुकूमशहांचा अंत कसा होतो ते पाहिले आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये लोकांनी भाजपला जनादेशातून संदेश दिला होता, परंतु भाजप नेतृत्वाने त्यातून धडा घेतला नाही. आता मणिपूरमध्ये लोकांना खरे काय ते कळले आहे. ईशान्येकडून बदलाचे वारे वाहू लागले असून राजकीय परिवर्तनाला सुरुवात झाली आहे, असे उद्गार विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काढले.
प्रदेश काँग्रेस समितीतर्फे पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मडगावच्या ईएसआय (कोविड) इस्पितळातील रुग्ण तसेच डॉक्टर्स, उर्वरित वैद्यकीय पथक व इतरांना आहार सामग्री वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष आल्तिनो गोम्स, सचिव दामोदर शिरोडकर, नगरसेवक डॉरिस टेक्सेरा, मनोज मसूरकर, अविनाश शिरोडकर, दामोदर नाईक, दीपा शिरोडकर, मडगाव गट अध्यक्ष गोपाळ नाईक, प्रदेश काँग्रेस सदस्य जेम्स आंद्राद, ऍव्हर्सन वालिस व इतर हजर होते. काँग्रेस विधिमंडळ गट अध्यक्ष दिगंबर कामत यांच्या हस्ते डॉ. आयरा आल्मेदा व डॉ. विश्वजित फळदेसाई यांच्याकडे आहार सामग्री सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपले बलिदान दिलेल्या सैनिकांना दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
भाजपकडे फक्त जुमला राजकारणाचे धोरण
एखाद्या पक्षाच्या नेतृत्वाला ज्यावेळी आपल्या पक्षाची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत नेण्यात अपयश येते त्यावेळी इतर पक्षांतील आमदार, कार्यकर्ते फोडून ते आपला पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करतात. भाजपने आज आपली ध्येय-धोरणे पायदळी तुडवली असून ‘जुमला राजकारण’ करून सत्ता बळकावणे हे एकमेव धोरण आज भाजपकडे आहे. काँग्रेस पक्ष सामान्य माणसांच्या प्रति नेहमीच संवेदनशील राहिला असून त्यामुळेच आमचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आम्ही साधेपणाने व रुग्णांच्या सेवेने साजरा करत आहोत, असे कामत पुढे म्हणाले.
लोकांना दिलासा देण्यात सरकार अपयशी
गोव्यातील भाजप सरकार कोविड संकटाच्या काळातही लूटमार करण्यात व्यस्त असून सामान्य लोकांना दिलासा देण्यात या सरकारला पूर्ण अपयश आले आहे. भाजपाला लोकांच्या हाल-अपेष्टांचे सोयरसुतक नसून त्यांना केवळ राजकारण व सत्ता दिसते, अशी टीका चोडणकर यांनी केली. आज चीनच्या सीमेवर आमचे सैनिक बलिदान देत असताना व कोविड संकटात लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना भाजप व्हर्च्युअल रॅली करून मोदी सरकारच्या दुसऱया कार्यकाळातील वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करतो हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.
कोविड रुग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, अन्य वैद्यकीय कर्मचारी तसेच आरोग्य सेवक व त्यांच्या कुटुंबियांच्या भल्यासाठी सर्व उपस्थितांनी यावेळी प्रार्थना केली. आल्तिनो गोम्स यांनी स्वागत केले. दामोदर शिरोडकर यांनी कोविड इस्पितळातील वैद्यकीय पथकाच्या सर्व सदस्यांचे त्यांच्या अविरत सेवेसाठी काँग्रेस पक्षातर्फे अभिनंदन केले.









