जम्मू-काश्मीरमध्ये कठोर धोरणाचा दिसला प्रभाव
वृत्तसंस्था/ श्रीनगर
केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त करण्याची घोषणा केली होती. तसेच राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले होते. मागली दोन वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमधील स्थितीत प्रचंड बदल झाला आहे. दहशतवादी संघटनांच्या ओव्हरग्राउंड वर्कर्सवर कारवाई, मोठय़ा संख्येत सुरक्षा दल तैनात केल्याने केंद्रशासित प्रदेशात दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.
गृह मंत्रालयाकडून सादर आकडेवारीनुसार यंदा जानेवारी ते जुलैदरम्यान दगडफेकीच्या घटनांमध्ये 2019 च्या तुलनेत 88 टक्क्यांची घट झाली आहे. अशाच प्रकारे जवान जखमी होण्याचे प्रमाण 93 टक्के तर नागरिकांना ईजा होण्याचे प्रमाण 84 टक्क्यांनी कमी झाले आहे.
2019 मध्ये जानेवारी ते जुलैदरम्यान दगडफेकीच्या 618 घटना घडल्या होत्या. तर 2020 मध्ये याच कालावधीत दगडफेकीच्या 222 घटना घडल्या होत्या. हा आकडा यंदा मात्र केवळ 76 राहिला आहे. 2019 मध्ये 64 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. तर यंदा 10 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. अशाचप्रकारे पॅलेट गन आणि लाठीमाराने जखमी होणाऱया नागरिकांच्या संख्येतही मोठी घट दिसून आली ओह. 2019 मध्ये हा आकडा 339 इतका होता. तर यंदा हा केवळ 25 वर आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे. 2019 च्या जानेवारी ते जुलैदरम्यान केवळ 82 दहशतवादी जेरबंद झाले होते. तर यंदा आतापर्यंत 178 दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे.









