प्रतिनिधी / रत्नागिरी
दक्षिण रत्नागिरीत मंगळवारी दुपारी 3 च्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने चांगलीच तारांबळ उडवून दिली. रत्नागिरीसह संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यात जोरदार पडलेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदारांसह शेतकरीही धास्तावला आहे. गुहागर, चिपळूण तालुक्यातील काही भागातही सायंकाळी 5.30च्या सुमारास पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
अर्ध्या तासात राम आळी तुंबली
रत्नागिरी शहरात मंगळवारी दुपारी 3.30च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने राम आळीतील बाजारपेठ रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाणी तुंबल्याने येथील व्यापाऱयांसह फेरीवाले व पादचाऱयांची तारांबळ उडवली. रत्नागिरीत मंगळवारी दुपारपासून सुमारे तास-दिड तास धुवाँधार पाऊस बरसला. यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. अचानक पडलेल्या या पावसाने शहरातील रस्त्यांवर अनेक भागात चिखलाचे साम्राज्य पसरले. रस्त्यांची खोदाईची कामे सुरू असल्याने मोठय़ा प्रमाणात माती रस्त्यावर व रस्त्याकडेला काढून ठेवण्यात आल्याने या पावसाने ही परिस्थिती ओढवली. मुसळधार पावसामुळे राम आळीत पाणी भरले. गटारे मातीने बुजल्यामुळे बाजारपेठेतील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबले. यामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे या ठिकाणाहून वाहनांना व पादचाऱयांनाही जाणे मुश्कील झाले होते. पाऊस कमी होताच तुंबलेले पाणी ओसरू लागले होते.
मंगळवारी दुपारी 3.30च्या सुमारास रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरुप प्राप्त झाल्याने काही काळ वाहतूकही थांबली होती. शहरभर उवडलेले रस्ते, तुंबलेली गटारे, माती-खडीचे ढीग असताना कोसळलेल्या पावसाने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने साऱयांचीच तारांबळ उडवली. तालुक्यात विविध ठिकाणी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. घेले काही दिवस वारंवार पाऊस पडत असून पुढील काही दिवसही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱयाची चिंता मात्र वाढली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात सुरु झालेला पाऊस नोव्हेंबरपर्यंत सातत्याने सुरुच असल्याने शेतकऱयांचे वेळापत्रकच बिघडले आहे.

संगमेश्वरात तासभर मुसळधार
संगमेश्वरः तालुक्यात विजांच्या गडगडाटासह मंगळवारी दुपारी पावसाच्या सरी पडल्या. शनिवारी व रविवारी सायंकाळच्या दरम्यान विजांच्या गडगडाटासह अवकाळीच्या सरी पडल्या. अवकाळी पावसाने शेतकऱयांची निराशा वाढवली आहे. 4 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने 1 तास हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा पसरला होता.
लांजा तालुक्यात मुसळधार
लांजाः आठवडाभर सुरू असलेल्या ढगाळ वातावरण व अवकाळीच्या सरींमुळे नागरिक त्रस्त असतानाच मंगळवारी दुपारी 3 च्या दरम्यान पुन्हा अवकाळी पाऊस पडला. लांजा तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून दिवसभर ढगाळ वातावरण आणि उष्म्याने नागरिक हैराण आहेत. मंगळवारी दुपारी 3 च्या दरम्यान तालुक्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे अवकाळी पाऊस पडला. यानंतर सायंकाळी 5.45 च्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरूवात झाली. भातशेतीची कामे पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून आंबा, काजू पीकाला नवी पालवी फुटत असताना पावसाने शेतकऱयांना संकटात आणले आहे.
गुहागरात मेघगर्जनेसह वर्षाव
गुहागरः मंगळवारी सायंकाळी 5.45च्या सुमारास गुहागर व परिसरात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. ढगाळ वातावरणामुळे दृष्यमानता कमी झाली होती. अचानक आलेल्या पावसाने नोकरीवरून, शाळेतून घरी परतणाऱयांची तारांबळ उडाली. तालुक्यातील काही भागात जोरदार करत काही भागात हलक्या सरी कोसळल्या. यानंतर हवेमध्ये गारवा निर्माण झाला.









