सेऊल
दक्षिण कोरिया देशामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली असल्याची बाब समोर आली आहे. सदरचे रुग्ण ओमिक्रॉन व्हेरीयंटचे असल्याची बाबही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. गुरुवारी एकाच दिवशी दक्षिण कोरियामध्ये 27000 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे. एकंदर कोरोना रुग्णांची संख्या या देशामध्ये आता 9 लाख 34 हजार 656 वर पोहचली आहे. योनाप न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या एक-दोन दिवसामागे रोज 22 हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आले आहेत. प्रशासन आता सतर्क झाले आहे. या देशामध्ये कोरोनाने बळींची संख्या 6 हजार 836 वर पोहचली असून यामध्ये नव्याने 24 जणांची भर पडली आहे. गेले पाच दिवस देशामध्ये मोठी सुट्टी साजरी केली गेल्याने मोठय़ा प्रमाणात लोक बाहेर पडले होते. पण आता रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाने दोन आठवडय़ांसाठी सामाजिक अंतरासह निर्बंधही जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.









