दक्षिण कोरियात संक्रमणाची तिसरी लाट उद्भवली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने मान्य केले आहे. सलग 8 व्या दिवशी तेथे 200 हून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. जानेवारी ते मार्चदरम्यान तेथे पहिली लाट होती. जून ते ऑगस्टदरम्यान दुसरी आणि आता तिसरी लाट फैलावली आहे.
फ्रान्सला किंचित दिलासा

फ्रान्समध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कठोर टाळेबंदी दोन आठवडय़ांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. एक आठवडय़ापूर्वी सरकारसाठी रुग्णसंख्या चिंतेचे कारण ठरली होती. फ्रान्समध्ये टाळेबंदीचा परिणाम आता दिसू लागल्याने जनतेतील रोष कमी होण्याची अपेक्षा सरकारला वाटत आहे.
अमेरिका : स्थिती खराब

अमेरिकेच्या रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसभरात तेथे 1 लाख 77 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. ओरेगन आणि मिशिगनमध्ये संक्रमण अत्यंत वेगाने फैलावत आहे. अन्य प्रांतांच्या तुलनेत 10 प्रांतांमध्ये संक्रमणाचा धोका अधिक आहे. दुसरीकडे कोविड-19 वरून राजकारणही सुरू आहे. निवडणूक हरूनही ट्रम्प प्रशासन महामारीचा धोका गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. तर नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्वतःच्या कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक घेतली आहे.









