वृत्तसंस्था/ केपटाऊन
चालू महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा संघ तब्बल 14 वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकच्या दौऱयावर येणार आहे. या दौऱयात उभय संघामध्ये दोन कसोटी सामने खेळविले जातील. या दौऱयासाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने 21 जणांचा संघ जाहीर केला असून नवोदित वेगवान गोलंदाज डॅरेन डय़ूपव्हिलॉन आणि ओटनील बार्टमन यांचा समावेश करण्यात आला आहे. या दौऱयासाठी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघामध्ये रबाडा आणि अष्टपैलू प्रिटोरियस यांचे पुनरागमन झाले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि पाक यांच्यात ही द्विदेशीय कसोटी मालिका खेळविली जात आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाने लंकेचा 2-0 असा पराभव केला होता. दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व डी कॉककडे सोपविण्यात आले आहे. पाक दौऱयात उभय संघातील कसोटी मालिका कराची आणि रावळपिंडी येथे खेळविली जाणार आहे. पहिली कसोटी 26 जानेवारीपासून सुरू होईल.
दक्षिण आफ्रिका कसोटी संघ- डी कॉक (कर्णधार), बव्हुमा, मार्करम, डु प्लेसिस, एल्गार, रबाडा, प्रिटोरियस, केशव महाराज, एन्गिडी, व्हान डर डय़ुसेन, नॉर्त्जे, मुल्डर, सिपम्ला, हेंड्रिक्स, व्हेरेयीन, एर्वी, के. पीटरसन, शम्सी, लिन्डे, डय़ूपव्हिलॉन आणि बार्टमन.









