द. आफ्रिका ऑलिम्पिक समितीची धडक कारवाई, सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली
केपटाऊन / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेच्या ऑलिम्पिक समितीने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर करत देशातील क्रिकेटची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यांच्या या तडकाफडकी निर्णयानंतर क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली. अर्थात, आयसीसीच्या नियमाप्रमाणे केंद्राचा मंडळात हस्तक्षेप झाल्यास त्या राष्ट्रीय संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी लादली जाण्याची तरतूद असल्याने आफ्रिकन संघ यामुळे अडचणीत असणार आहे.
दक्षिण आफ्रिकन क्रीडा फेडरेशन व ऑलिम्पिक समिती यांनी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाला आपल्या निर्णयाची माहिती कळवली. ‘क्रिकेट दक्षिण आफ्रिकन मंडळाची कार्यकारिणी व कार्यकारिणी बहिस्थ पदाधिकारी (कंपनी सेक्रेटरी, हंगामी सीईओ, सीएफओ व सीओओ) यांनी व्यवस्थापनातून बाहेर व्हावे’, असा आदेश त्यांनी याप्रसंगी बजावला. डिसेंबर 2019 पासून गैरव्यवस्थापन व गैरव्यवहार दिसून आले असून त्यामुळे ही कारवाई करावी लागत असल्याचे ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केले.
‘दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळात जे गैरव्यवहार सुरु झाले, त्यामुळे, अगदी मंडळातील सदस्यच चिंतेत पडले. या गैरव्यवहारामुळे क्रिकेट मंडळाने विद्यमान संघाचे सर्व खेळाडू, भागधारक, प्रायोजक व क्रिकेटप्रेमी या सर्वांनाच गोत्यात आणण्याचा प्रकार केला आहे. क्रिकेटच्या प्रतिष्ठेला डाग लागता कामा नये, याचा त्यांना विसर पडला’, असे ऑलिम्पिक समितीने नमूद केले.
‘आम्ही दोन बैठकांमध्ये दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाला याबाबत कडक समज दिली होती. शिवाय, जे गैरव्यवस्थापन, गैरव्यवहार केले, त्याचा खुलासा करण्याचे निर्देश दिले. पण, मंडळ याबाबत काहीही स्पष्टीकरण देऊ शकले नाही’, असे ऑलिम्पिक समितीने पुढे स्पष्ट केले. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय एकमताने घेतला गेला असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे. याप्रकरणी क्रिकेट दक्षिण आफ्रिका व आयसीसीचे पदाधिकारी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
…तर दक्षिण आफ्रिकन संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे पुन्हा बंद!

राष्ट्रीय नियामक क्रिकेट मंडळात कोणत्याही कारणाने राजकीय हस्तक्षेप होऊ नये, असा आयसीसीचा नियम आहे. पण, आता दक्षिण आफ्रिकन ऑलिम्पिक समिती व क्रीडा फेडरेशन यांनी थेट दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळच बरखास्त केल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. आयसीसीच्या नियमानुसार, एखाद्या मंडळाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप झाला तर त्या संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हद्दपार केले जाते. तो नियम लागू झाला तर दक्षिण आफ्रिकन संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे पुन्हा बंद होऊ शकतात. यापूर्वी 1970 मध्ये वंशभेदी धोरणामुळे त्यांच्यावर बंदी लादली गेली. नंतर 1991-92 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले होते.
राजकीय हस्तक्षेपामुळे यापूर्वी झिम्बाब्वेवर कारवाई
राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या कारणामुळे यापूर्वी आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेटवर बंदी लादली होती. खेळाला राजकारणापासून अलिप्त राखण्यासाठी हे पाऊल आयसीसीने उचलले होते. तोच नियम ते आता दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळासाठीही लागू करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. पुढे झिम्बाब्वेवरील बंदी मागे घेण्यात आली व यामुळे त्यांना पुनरागमनाची संधी मिळाली.









