मंत्री उमेश कत्ती यांचे बैठकीत आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
जिह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. कोणाचाही कोरोनाने मृत्यू होऊ नये, यासाठी जनतेने कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा जनतेने कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱयांना कोविडबाबतची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या. यावेळी त्यांनी नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाबाबतची परिस्थिती अधिकाऱयांकडून जाणून घेतली. बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्राच्या सीमेवर असून अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. दररोज 15 हजार लोकांचे लसीकरण होत आहे. दररोज पाच हजार लोकांच्या घशातील द्रावाची तपासणी करण्यात येत आहे. असे असले तरी सामाजिक अंतर आणि मास्क वापरणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक तालुक्मयामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करावे. जत्रा, उत्सव पूर्णपणे बंद करावेत, अशी सूचनादेखील उमेश कत्ती यांनी अधिकाऱयांना दिली आहे. यापुढे आता 15 दिवसांतून एकदा बैठक घेणार असल्याचे उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले आहे. कोविडबाबत कोणताही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करणार नाही. महाराष्ट्र, गोवा या सीमांवर चेकपोस्टची उभारणी करावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार, जि. पं. सीईओ दर्शन एच. व्ही., पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर, प्रांताधिकारी अशोक तेली, महापालिका आयुक्त जगदीश के. एच. आदी उपस्थित होते.









