एल्वीस गोम्स यांचा प्रश्न : म्हापसा येथील प्रत्रकार परिषदेत तक्रारी निकाली काढण्याची मागणी
प्रतिनिधी /पणजी
सरकार आज दक्षता खात्यातर्फे राज्यात दक्षता सप्ताह साजरा करीत आहे मात्र त्याबद्दलची योग्य ती जनजागृती केली जात नाही त्यामुळे दक्षता खाते पूर्णतः कोलमडले आहे. कित्येक तक्रारी वर्षांनुवर्षे दक्षता खात्याकडे पडून असून त्यांचा निकालच लागत नाही आहे. तक्रार करणाऱयाची ओळख गुपित ठेवायची असते मात्र येथे जगजाहीर करुन त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. घोटाळेबाज, भ्रष्टाचारी सर्व सरकारमध्ये सामिल झाल्याने त्यांची चौकशी होणार तरी कशी? असा प्रश्न काँग्रेस नेते एल्वीस गोम्स यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेस नेते विजय भिके, उत्तर गोवा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, प्रवक्ते संजय बर्डे, जॉन नाझारेथ, फिरोझ खान, ऍड. रोशन चोडणकर, अतुल नाईक, संदीप पेडणेकर, सितेश मोरे, राजेंद्र कोरगांवकर आदी उपस्थित होते.
विविध घोटाळ्य़ांचे काय झाले ते प्रथम जाहीर करा
पॉवर घोटाळा, एसजीझेड घोटाळा, उच्च न्यायालयाने आयडीसी मंडळ दोषी असे म्हटले होते त्या प्रकरणाचे काय झाले? पोलीस स्थानक दगडफेक प्रकरण, खाण घोटाळा, लुईस बर्जरप्रकरण, धारगळमधील सुमारे 30 लाखा चौ.मी. जमीन कॅसिनोवाल्यांच्या घशात गेली त्याचे काय?, राज्यातील जमीन घोटाळ्य़ांचे काय झाले?, जुने गोवे येथे बेकायदेशीर बांधकाम प्रकरण, पणजी स्मार्टसिटीच्या नावाखाली परस्पर जमिनी विकल्या याबद्दलची माहिती अगोदर जाहीर करा, अशी मागणी एल्वीस गोम्स यांनी केली.
दक्षता खात्यातील 9 हजार तक्रारी निकालात काढा : विजय भिके
राज्यात भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढलेली आहे. अगोदर ज्यांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून आरोप करायचे तेच आज भाजपमध्ये आहेत. आपल्याला पाहिजे तसे कायदे भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे दक्षता खाते निरुपयोगी ठरु लागले आहे. दक्षता खात्याकडे 9 हजार तक्रारी निकालाविना पडून आहेत. त्या अगोदर निकालात काढा, अशी मागणी विजय भिके यांनी केली.
सरकारने दक्षता खात्याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे : जॉन नाझारेथ
रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पूर्वी डांबरीकरण करताना टॅक्सीकल सेल असायचा. ते छोटा होल मारुन तपासणी करायचे. निविदाप्रमाणे डांबर आदी सामान बरोबर आहे का नाही याची तपासणी करायचे. डांबराची ग्रेड तपासली जायची. त्यासाठी खास अधिकारी असायचा मात्र आज ते नाही. दक्षता खात्यात व्हेवसाईट असायची मात्र आज त्याचा अभाव आहे. सरकार दक्षता खात्याबाबत खरोखरच गंभीर आहे तर त्यानी या खात्याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी माजी निवृत्त अधिकारी जॉन नाझारेथ यांनी केली.









