मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार
निर्माता हरमन बावेजा मल्याळी चित्रपट द ग्रेट इंडियन किचनचा हिंदीमध्ये रिमेक तयार करत असून यात दंगलगर्ल सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आरती करत असून त्यांनी यापूर्वी कागो चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती.
एक कलाकार म्हणून याहून अधिक चांगल्या व्यक्तिरेखेची अपेक्षा करू शकत नव्हते. ही व्यक्तिरेखा साकारण्याची प्रतीक्षा करत असल्याचे सान्याने म्हटले आहे. द ग्रेट इंडियन किचन चित्रपटात काहीतरी विशेष आहे. चित्रपट संपल्यावरही याची कहाणी तुमचा पाठलाग सोडत नाही. याचमुळे पूर्ण देशातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट निर्माण करू इच्छितो असे हरमनने नमूद पेले आहे.

हा एक उत्तम पटकथा असलेला चित्रपट आहे. ही पटकथा पडद्यावर दाखविण्यासाठी मी अत्यंत उत्सुक असल्याचे उद्गार आरती यांनी काढले आहेत. हरमन याचबरोबर कॅप्टन इंडिया या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
द ग्रेट इंडियन किचन हा मल्याळी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चित्रपट आहे. 2021 मध्ये अमेझॉन प्राइमवर तो झळकला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन जियो बेबी यांनी केले होते. चित्रपटात निमिशा सजायन आणि सूरज वेंजरामूडु यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.









