दहशतवादी मानसिकतेला पाठिंबा असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप : बळ्ळारीमध्ये प्रचारसभा
► प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेस आपली व्होट बँक वाचवण्यासाठी दहशतवादासमोर गुडघे टेकत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर चौफेर हल्ला चढवला. बळ्ळारी येथे आयोजित प्रचारसभेत ‘द केरळ स्टोरी’वर भाष्य करत या चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करून दहशतवादाचे रक्षण करणाऱ्या घटकांना काँग्रेस पाठिंबा देत असल्याचा आरोप केला. ‘बॉम्ब, बंदुका आणि पिस्तुले खूप आवाज करतात, पण समाजाला आतून पोकळ करून टाकणाऱ्या दहशतवादी कारस्थानांचा आवाज ऐकू येत नाही’, असेही त्यांनी याप्रसंगी सुनावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जय बजरंग बली’चा जयघोष करत भाषणाची सुरुवात केली. आता काँग्रेसची अवस्था इतकी वाईट झाली असून त्यांचे पाय थरथर कापत असल्यामुळे काँग्रेसने माझ्यावर जय बजरंगबली म्हणण्यावर आक्षेप घेण्यास सुऊवात केल्याचा दावा त्यांनी केला. बजरंग दलावर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर बोलताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक खोटी आश्वासने असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ताळेबंद आणि तुष्टीकरणाचा गठ्ठा असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी बळ्ळारीमध्ये सुमारे 47 मिनिटे भाषण केले. गेल्या आठवडाभरातील मोदींचा हा तिसरा कर्नाटक दौरा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चर्चेत असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर परखडपणे बोलले. केरळ हे देशातील एक सुंदर राज्य आहे. अशा स्थितीत तेथे छुप्या पद्धतीने दहशतवादी कट रचला जात असल्याचे सर्वांच्याच निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दहशतवाद्यांबाबत काँग्रेसच्या दृष्टिकोनावर बोलताना जेव्हा दहशतवादावर कारवाई होते तेव्हा काँग्रेसच्या पोटात दुखू लागते, असेही ते म्हणाले.
दहशतवादावर भाजप कठोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दहशतवादावर खुलेपणाने भाष्य केले. कर्नाटकला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था या सर्वात महत्त्वाच्या गरजा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कर्नाटक दहशतवादापासून मुक्त राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दहशतवादाविरोधात भाजप नेहमीच कठोर राहिल्याचे दाखलेही त्यांनी दिले.
कर्नाटकातील बंधू-भगिनी सुदानमधून सुखरूप मायदेशी
सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील अनेकांना सुखरूप भारतात परत आणण्यात आले आहे. सुदानमधील परिस्थिती पाहून मोठ्या देशांनीही आपल्या नागरिकांना तेथून बाहेर काढण्यास नकार दिला होता, परंतु भारत सरकार आपल्या प्रयत्नात गुंतले होते. आम्ही ‘ऑपरेशन कावेरी’च्या माध्यमातून देशातील अनेक सुखऊपपणे मायदेशी आणले. सुदानमधील संघर्षाच्या वणव्यात विमानाने पोहोचणे कठीण असतानाही ही मोहीम राबविण्यात आली. मात्र, काँग्रेसने अशा कठीण काळात देशाला साथ दिली नसल्याचा दावाही त्यांनी केला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख
येडियुरप्पा आणि बोम्माई यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारला केवळ साडेतीन वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली, असे पंतप्रधान म्हणाले. या अगदी कमी कालावधीतही डबल इंजिन सरकारचा विकासाचा वेग सुसाट आहे. मात्र, येथे काँग्रेसचे सरकार असताना कर्नाटकच्या विकासाऐवजी भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले. याचे कारण काय होते? असा प्रश्न उपस्थित करत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच सांगितले होते की, त्यांच्या सरकारने दिल्लीतून 100 पैसे पाठवले तर केवळ 15 पैसे गरिबांपर्यंत पोहोचतात. अर्थातच एकप्रकारे काँग्रेस हा 85 टक्के कमिशन असलेला पक्ष आहे हे त्यांनी स्वत: मान्य केले होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.









