दीपिका पदूकोनने दिली माहिती
मागील वर्षी जानेवारीमध्ये द इंटर्नच्या हिंदी रिमेकची घोषणा करण्यात आली होती. पण लॉकडाउन आणि एप्रिलमध्ये ऋषि कपूर यांच्या निधनानंतर चित्रपटाचे गाडे पुढे सरकले नव्हते. पण आता ऋषि कपूर यांच्या जागी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आल्याची माहिती दीपिक पदूकोनने सोशल मीडियावरून दिली आहे.
माझ्या सर्वात विशेष सहकारी कलाकारासोबत पुन्हा काम करण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. अमिताभ बच्चन यांचे द इंटर्नच्या भारतीय स्वरुपात स्वागत असल्याचे दीपिकाने म्हटले आहे. 2015 मध्ये प्रदर्शित पीकू चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते.
कॉमेडी ड्रामापट

2015 मध्ये प्रदर्शित द इंटर्न एक कॉमेडी ड्रामापट आहे. 70 वर्षीय विधूर व्यक्ती ऑनलाइन फॅशन संकेतस्थळात इंटर्न म्हणून काम करण्यासाठी पोहोचत असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले होते. मूळ हॉलिवूडपटाचा रिमेक कन्नडमध्ये ‘हॉट्टेगागी गेनु बट्टेगागी’ नावाने 2018 मध्ये तयार झाला होता. तर हिंदीतील चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रविंद्रनाथ शर्मा करणार आहेत. पटकथा अक्षत घिल्यडियाल आणि मीतेश शाह यांची आहे.
हॉलिवूडपट द इंटर्नचे दिग्दर्शन नॅन्सी मेयर्स यांनी केले होते आणि मुख्य भूमिकेत ऍनी हॅथवे आणि रॉबर्ट डी नीरो यांनी अभिनय केला होता. चित्रपटाने जगभरात जवळपास 200 दशलक्ष डॉलर्सचा गल्ला जमविला होता.









