वृत्तसंस्था/ रावळपिंडी
पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी रंगतदार स्थितीत पोहोचली असून द.आफ्रिकेला शेवटच्या दिवशी अद्याप 243 धावा काढण्याची गरज आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशीअखेर द.आफ्रिकेने 370 धावांचे मिळाल्यानंतर 1 बाद 127 धावा जमविल्या होत्या.
पाकने पहिल्या डावात 272 धावा जमविल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 201 धावांत आटोपला. त्यानंतर पाकने दुसऱया डावात 298 धावा काढल्यानंतर द.आफ्रिकेला 370 धावांचे विजयाचे आव्हान मिळाले. पाकच्या दुसऱया डावात मोहम्मद रिझवानने नाबाद 115 धावा जमविल्या तर द.आफ्रिकेच्या जॉर्ज लिन्डेने 64 धावांत 5 बळी टिपले. द.आफ्रिकेच्या दुसऱया डावात डीन एल्गार 17 धावा काढून बाद झाल्यानंतर मार्करम व रासी व्हान डर डय़ुसेन यांनी दुसऱया गडय़ासाठी 94 धावांची अभेद्य भागीदारी करीत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मार्करम 9 चौकार, 2 षटकारांसह 59 व डय़ुसेन 8 चौकारांसह 48 धावांवर खेळत आहेत. शाहीन आफ्रिदीने एकमेव बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः पाक प.डाव 272, द.आफ्रिका प.डाव 201, पाक दु.डाव 298 (रिझवान नाबाद 115, नौमन अली 45, अझहर अली 33, अश्रफ 29, लिन्डे 5-64, केशव महाराज 3-118, रबाडा 2-34), द.आफ्रिका दु.डाव 41 षटकांत 1 बाद 127 (मार्करम खेळत आहे 59, एल्गार 17, डय़ुसेन खेळत आहे 48, अवांतर 3, आफ्रिदी 1-22.









