भडकलेल्या उदयनराजेंची वक्तव्य
प्रतिनिधी/ सातारा
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, कर्मवीर अण्णांनी जो विचार मांडला. त्याच विचाराने रयत शिक्षण संस्था पुढे जायला हवी होती. परंतु संस्थेत एका कुटुंबाचा शिरकाव करण्यात आला आहे. रयत शिक्षण संस्थेचे खाजगीकरण होवू देणार नाही. सध्या रयत या शिक्षण संस्थेत राजकारण शिरले आहे. वटवृक्ष उलटा केला तर सत्तेचे केंद्रीकरण दिसून येईल अशी तोफ खासदार उदयनराजे यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर डागली तसेच क्रीडा प्रेमींच्या बैठकीत शाहु क्रीडा संकुलावरुन तत्कालिन जिह्याच्या पालकमंत्र्यांना मुस्काडलं पाहिजे, थोबाडलं पाहिजे अशी वक्तव्यं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भडकलेल्या उदयनराजेंनी करुन जिल्हय़ासह राज्यात खळबळ माजवून दिली आहे.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ऍड. दत्ता बनकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार उदयनराजे म्हणाले, या सातारा जिह्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. अशा या पुरोगामी सातारा जिह्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत नव्हता. तो विचार गांधीजींना अभिप्रेत नव्हता. तो विचार अनेक विचारवंतांना अभिप्रेत नव्हता. तो विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांनाही अभिप्रेत नव्हता. एवढं मोठं पाप माझ्या हातून कधी घडलं नाही. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो तेव्हा कोणीही असो मी माझा विचार परखडपणे मांडत असतो. त्यावेळी लोकांना वाटतं की हे विरोधासाठी विरोध करतात. कोणीतरी बोललं पाहिजे. कदाचित बहुतांशी लोकांना अंगवळणी पडले आहे की सत्तेच्या, प्रवाहाच्या विरुद्ध जावू नका, प्रवाह म्हणजे काय, काही लोक चुकीचे करत असतील तर त्याला विरोध केला पाहिजे.
रयत शिक्षण संस्थेची ऑक्टोबर 1919 ला स्थापना साली. कर्मवीर भाऊराव पाटील यांची कर्मभूमी सातारा ही होती. थोरले प्रतापसिंह महाराजांनी साताऱयात पुरोगामी विचार मांडले. त्या काळात त्यांनी शाळा सुरु केली. मुलांबरोबर स्त्रियांकरता शिक्षणाची दालन सर्वात प्रथम त्यांनी खुली केली. त्यातून प्रेरणा घेवून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, कर्मवीर अण्णांनी काम केले. सर्वसामान्य कुटुंबातील कुठलाही मुलगा, मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वाटचाल केली. मला अजून आठवते मी लहान होतो तेव्हा अण्णा आजींना भेटायला येत असत, चर्चा करायचे. पण निश्चितपणे सातारच्या राजघराण्याचे रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून मोठे योगदान आहे. या संस्थेला नाव सुंदर देण्यात आले आहे. खरोखर एवढ सुंदर नाव एखाद्या दुसऱया संस्थेला नाव असूच शकत नाही. ते म्हणजे रयत. लोकांच्याकरता लोकांसाठी, या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण प्राप्त व्हावं, ज्ञान मिळावं. ती मुलं मोठी होवून मोठमोठय़ा हुद्यावर जावीत, ती मुल मोठमोठी उद्योगपती व्हावेत. हा विचार म्हणजे देश घडविण्याचा विचार त्या काळात मांडण्यात आला.
संस्थेचे बोधचिन्ह वडाच्या झाडाचं ठेवण्यात आले. काळ जसा बदलतो तसा रयतचा अर्थ बदलू शकत नाही. रयत शिक्षण संस्थेची जी घटना आहे त्यात कुठल्याही प्रकारचे राजकारण येवू नाही म्हणून संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असावा. जेणेकरुन जास्तीत जास्त शासनाचा फायदा सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना व्हावा ही त्यामागची मुलभूत कल्पना होती. त्या काळात पुरोगामी विचारच होता. आज जर पाहिले तर आमच्या कुटुंबाचे योगदान असताना आमच्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीला सभासद म्हणून घेतले नाही. किंबहुना ज्यावेळी मी संबंधित व्यक्तींना जे सर्वेसर्वा आहेत त्यांना विचारणा केली. का असे, मला करा असा अजिबात अट्टाहास नाही. आम्हाला मतदानांचा अधिकार पण देवू नका पण निदान ज्याला आपण नॉलेजमेंट म्हणतो की ह्या कुटुबांचे योगदान आहे तर ऑनररी मेंबर सुद्धा. ते म्हणाले आम्हाला बोर्डासमोर ठेवावे लागेल. आम्हाला चर्चा करावी लागेल. बोर्डाने मान्यता दिली तरच होईल. ठिक आहे तर रयतची व्याख्या बदललेली दिसते. घेवू नका ही संस्था रयतेची आहे, कुटुंबाची नाही. ज्या ज्या लोकांना मेंबर केलं, कसं केलं पहा. ‘रयत’चे अर्थ आता कुंटुंबापूरता मर्यादित झाला आहे. रयत म्हणजे कुटुंब झाले आहे. रयतमध्ये सत्तेच केंद्रीकरण करण्यात आला. अण्णांनी वटवृक्ष लावलं होतं आता ते उलट करायचे म्हणजे केंद्रीकरण झालेले दिसेल. असे जर झाले तर ते रयतचे झाड वटणार, त्याला वाळवी लागणार. तसं झाले तर असे होवू नये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहवं लागणार, हे होवू देणार नाही, असे उदयनराजे यांनी सांगितले.









