सुधाकर काशीद /कोल्हापूर

ती गौरी, ती लक्ष्मी, ती दुर्गा, ती चंडिका, ती काली, देवीस्वरुपाची ही विविध रुपे गौरी होऊन ती घराघराला समृद्धी देते, लक्ष्मी होऊन व्यापार वाढवते. दुर्गा होऊन अन्यायाला प्रतिकार करते. तर चंडिका आणि काली होऊन असुरी वृत्तीचा नाश करते. देवीचे तसेच मातृशक्तीचे ती प्रतीक आहे. स्त्राrशक्तीसुद्धा अशाच प्रतिकात्मक रुपात पाहिली जाते. आजची स्त्री सुद्धा गौरीप्रमाणे कुटुंबाला समृद्धी आणते. तर दुर्गा होऊन अन्यायाला प्रतिकार करते. देवीस्वरुप दुर्गा असुरांशी लढते आणि घराघरातील दुर्गा व्यवस्थेशी लढते. अशा दुर्गांचा परिचय आजपासून देत आहोत.
ती आपल्या सहकाऱयांसमवेत दुचाकीवरून जिल्हा परिषदेत निघाली होती. तिच्या पुढे एक दुचाकीस्वार होता. पुढे जाता-जाता तो पचकन रस्त्यावर थुंकत होता. तिने हा किळसवाणा प्रकार पाहिला, अन् आपल्या मोबाईलवरून त्या थुंकत जाणाऱया दुचाकीस्वाराचा फोटो काढला. आपली दुचाकी त्याच्यापुढे नेऊन त्याला थांबायला लावले, तसा तो रागातच थांबला. हिने त्याला ‘तुम्ही रस्त्यावर का थुंकता आहात’ असे विचारले. मग तर त्याला आणखीनच राग आला. रस्ता काय तुमच्या बापाचा आहे काय? असे म्हणत दुचाकीला किक मारून गुश्श्यातच पुढे सुसाट निघून गेला.
प्रसंग इथे संपत नाही. आता इथूनच पुढे खरा प्रसंग सुरू झाला. ती त्या दुचाकीस्वाराचा पाठलाग करायच्या भानगडीत पडली नाही. तर थेट तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख अभिनव देशमुख यांच्या ऑफिसमध्ये गेली. झालेला प्रकार तिने सांगितला. थुंकणाऱया व्यक्तीचा मोबाईलमधील फोटो दाखवला. थुंकण्याच्या विरोधातील तळमळ पाहून देशमुख साहेबांनी क्षणात मनावर घेतले. दुचाकी नंबरवरून त्याला शोधून काढले. आणि त्याच्यावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले. तुझ्या बापाचा रस्ता आहे का? म्हणणाऱयाने त्यांच्यासमोर हात जोडले.
अर्थात या एका प्रसंगामुळे कोल्हापुरात सर्वजण रस्त्यावर थुंकायचे बंद झाले का? अजिबात नाही. पण या एका प्रसंगातून ‘थुंकीमुक्त कोल्हापूर’ ही चळवळ मात्र उभी राहिली. आणि रस्ता आपला नाही आपल्या बापाचा समजून थुंकणाऱयांना निदान रस्त्यावर थुंकणे हा एक हजार रुपये दंडाचा गुन्हा आहे याची निदान माहिती तरी पसरवण्यास सुरुवात झाली. ही चळवळ आज कोल्हापुरात बऱयापैकी कार्यरत झाली आहे. आणि ही चळवळ सुरू होण्यास दीपा शिपूरकर या कोल्हापुरातील एका धाडसी तरुणीचा तिच्या अन्य सहकाऱयांसोबतचा मोठा वाटा ठरला आहे.
दीपा ही कोल्हापुरातील सुरेश शिपूरकर या सामाजिक कार्यकर्त्याची कन्या असल्याने तिची जडणघडण तशीच झाली. रोगराई पसरवण्यास थुंकीच अधिक कारणीभूत असते, हे दीपाला माहीत होते. तिने त्या बाबतीत खूप वाचनही केले होते. पण रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱयांना कसे आणि किती वेळा रोखायचे हे प्रॅक्टिकली 100 टक्के शक्य नाही हे तिलाही माहीत होते. त्यामुळे भररस्त्यात थुंकणाऱयांचे वर्तन तिला निमूटपणे पहावे लागत होते. अनेक शासकीय कार्यालयातच जिन्याच्या प्रत्येक कोपऱयात थुंकीचे ओंगळ ढपले पाहून तिला उबग येत होती. अनेक ठिकाणी तर ‘येथे थुंकू नये’ असे लिहिलेल्या फलकावरही लोक निर्लज्जपणे थुंकत असल्याचे तिला दिसत होते. या संदर्भात दीपा संबंधित प्रमुखांना भेटून निदान तुमच्या कार्यालयाचा परिसर तरी थुंकीमुक्त ठेवा अशी विनंती करत होती. पण ‘बाई आम्ही कोणाकोणाच्या तोंडाला हात लावणार’ अशी उत्तरे तिला कार्यालय प्रमुखांकडून मिळत होती.

सोशल मीडियाचा घेतला आधार
आपण एकाकी हे काम करू शकणार नाही याचा दीपाला अंदाज होताच. त्यामुळे तिने सोशल मीडियाचा आधार घेतला. ‘रस्त्यावर थुंकणाऱयांचे तोंड बंद करण्याकरिता एक रिमोट पाहिजे’ असा उपहासात्मक संदेश तिने पाठवला. हा संदेश ज्यांना कळाला त्यांनी तिच्या विचाराला आपला पाठिंबा दिला त्यामुळे तिला पाठबळ मिळाले.
अशातच कोरोनाचा संसर्ग पसरला व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे किती गंभीर आहे, याचा निदान त्या संसर्गाच्या काळापुरता तरी लोकांना अंदाज आला. या काळात जर एखादा सार्वजनिक ठिकाणी थुंकणारा दिसला की ती आक्रमक होऊन खडाखडा बोलू लागली. ‘थुंकलेले तुझ्याच रुमालाने पुसून काढ’ असे सुनावत ती थुंकणाऱयाकडून त्यांची थुंकी पुसून घेऊ लागली. काही जण रस्त्यावर थुंकायला कोणाची बंदी नाही असे प्रत्युत्तर देत होते. पण दीपा कोणालाही बधली नाही. ती रस्त्यावर थुंकणाऱयाला थुंकी पुसायला लावू लागली. हळूहळू तिच्या आक्रमकतेची चर्चा सुरू झाली. एक दिवस तिने एकाला पकडून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून कारवाईची पुढची पायरी गाठली. पण ही एकटी किती जणांना रस्त्यावर थुंकायचे थांबविणार? असा काळजी वजा सूर अनेक जण व्यक्त करत होते.
थुंकणाऱयास जाग्यावर 1 हजारांचा दंड
पण या परिस्थितीतही दीपाने आपली मोहीम थांबविली नाही. आता मात्र तिच्या चळवळीस प्रत्यक्ष हातभार लावणारे शंभर दीडशेजण तयार झाले आहेत. शंभर दीडशे ही संख्या तशी खूप कमी आहे. प्रमुख चौकात थुंकीमुक्त अभियानाचे फलक लागलेले आहेत. जाताजाता रस्त्यावर थुंकणाऱयांची शक्य तेवढी छायाचित्रे मोबाईलवर काढून महापालिका व पोलिसांकडे पाठवली जात आहेत. महापालिकेनेही आता या चळवळीची दखल घेऊन दक्षता पथके तयार केली असून थुंकणाऱयास जाग्यावर 1 हजारांचा दंड केला जात आहे. यामुळे लोक रस्त्यावर थुंकायचे थांबले असे नक्की नाही. पण रस्त्यावर थुंकताना तर आपण सापडलो तर दंड भरावा लागणार आणि भर रस्त्यात बसून थुंकी पुसावी लागणार एवढे तरी या चळवळीमुळे लोकांपर्यंत पोहोचले आहे. मनात आणलं तर दीपासारखी एक तरुणी काय करू शकते, याचे हे कोल्हापुरातले उदाहरण आहे. मात्र रस्त्यावर उतरून काम करणारे सहकारी आपल्या सोबत हवेत, अशी दीपाची अपेक्षा आहे.









