वृत्तसंस्था/ नवी मुंबई
एएफसी आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात जपानने थायलंडचा 7-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या विजयामुळे जपानने 2023 साली होणाऱया फिफा महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे तिकीटही निश्चित केले आहे.
या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपान संघातील युका सुगासावाने दर्जेदार कामगिरी करत 4 गोल नोंदविले. या स्पर्धेत जपानने यापूर्वी दोनवेळा विजेतेपद मिळविले होते. आता येत्या गुरूवारी चीन आणि व्हिएतनाम यांच्यात होणाऱया उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील विजयी संघाबरोबर जपानची उपांत्य फेरीत गाठ पडेल. 1983 साली या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा थायलंडचा संघ महिलांच्या आगामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रतेसाठी प्रयत्न करीत आहे. 2 आणि 4 फेब्रुवारी रोजी होणाऱया अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरूद्धच्या प्ले ऑफ लढतीनंतर हे चित्र स्पष्ट होईल. कोरोनाची बाधा अनेक खेळाडूंना झाल्याने थायलंड संघाला जपानविरूद्धच्या सामन्यात मोठी समस्या निर्माण झाली होती.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानने 27 व्या मिनिटाला आपले खाते उघडले. त्यांचा हा गोल सुगासावाने नोंदविला. पूर्वार्धातील स्टॉपेज टाईममध्ये जपानचा दुसरा गोल मियाजावाने केला. जपानचा तिसरा गोल सुमीदाने नोंदविला. मध्यंतरापर्यंत जपानने थायलंडवर 3-0 अशी आघाडी मिळविली होती. जपानचा चौथा गोल 64 व्या मिनिटाला सुगासावाने स्पॉट कीकवर नोंदविला. 75 व्या मिनिटाला युकीने जपानचा पाचवा गोल केला. सुगासावाने शेवटच्या पाच मिनिटामध्ये दोन गोल नोंदवून थायलंडचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. सुगासावाने आपला चौथा गोल 80 व्या मिनिटाला हेडरद्वारे मारला.









