28 खलाशी बेपत्ता ः 106 पैकी 75 जणांना वाचविण्यात यश
बँकॉक / वृत्तसंस्था
गेल्या 36 वर्षांपासून सेवेत असलेली थायलंडच्या नौदलाची युद्धनौका रविवारी रात्री थायलंडच्या आखातात बुडाली. येथील आखातात आलेल्या वादळात ही दुर्घटना घडली असून सोमवारी सायंकाळपर्यंत 75 जणांना वाचविण्यात आले आहे. दुर्घटनेवेळी 106 जण युद्धनौकेवर तैनात असल्याचे सांगण्यात आले. अजूनही 31 जण बेपत्ता असून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
‘एचटीएमएस सुखोथाई’ असे दुर्घटनाग्रस्त युद्धनौकेचे नाव आहे. सध्या जीवितहानीबाबत नौदलाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, वाचविण्यात आलेल्या 75 जणांपैकी तीन क्रू मेंबर्सची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. पाण्यावर तरंगत असलेली युद्धनौका वादळामुळे पाण्याखाली गेली आणि उसळी मारून पुन्हा पाण्यावर आल्यानंतर पॉवर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचे सांगण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे जहाजावरील नियंत्रण सुटले होते. या युद्धनौकेच्या मदतीसाठी तीन नौदल जहाजे आणि हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. हे जहाज बुडताना दिसल्यावर एचटीएमएस क्राबुरी तिथे पोहोचले. यादरम्यान वेगाने मदतकार्य राबवून 75 जणांना वाचवण्यात यश आले. त्यानंतर रविवारी रात्री साडेअकरानंतर युद्धनौकेला जलसमाधी मिळाली.
‘एचटीएमएस सुखोथाई’ सन 1987 पासून सेवेत आहे. हे अमेरिकेच्या टॅकोमा बोटबिल्डिंग कंपनीने बांधले आहे. याद्वारे थायलंडचे नौदल हवाई संरक्षण, सागरी लढाऊ आणि पाणबुडीविरोधी कारवाया करत होते. ‘एचटीएमएस सुखोथाई’ युद्धनौका रविवारी प्रचुआप खीरी खान प्रांतातील बंग सफान जिह्याच्या किनारपट्टीपासून फक्त 32 किमी (20 मैल) पाण्यात गस्तीवर होती. थाय नेव्हीच्या ट्विटर अकाऊंटद्वारे या जहाजाचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये खलाशांना मदत व शोधमोहीम राबवली जातानाचे काही फोटो आहेत. तसेच स्थानिक प्रसारमाध्यमांनी बचाव करण्यात आलेल्या खलाशांना इस्पितळात नेतानाचे फोटो प्रसारित केले आहेत.