कोरोना रुग्णांमधील लक्षणे-उपचारांमध्येही दिसेल बदल : श्वसनाची समस्या असलेल्यांनी काळजी घेण्याची गरज
कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आहे. जगभरात आतापर्यंत 3.68 कोटी रुग्ण सापडले असून भारतातही हा आकडा 70 लाखांच्या जवळ पोहोचला आहे. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, गर्दीवर नियंत्रण, जमावबंदी असे सर्व पर्याय वापरूनही कोणताही देश कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलेला नाही. आता रुग्णसंख्या रोडावत असली तरी पुन्हा थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे हिवाळी मोसमात रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही देशांमध्ये आता दुसरी लाट सुरू झाली असून नजिकच्या काळात दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतात सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णसंख्या कमी असली तरी जून महिन्यापासून बाधितांची संख्या वाढत गेली. तरीही वाढत्या मृत्यूंवर नियंत्रण मिळविण्यात भारताला यश आले. मात्र गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये भारतात 1 लाखांहून अधिक रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जगभरात सर्वत्रच कोरोना संकट अद्यापही थांबायचे नाव घेत नाही. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार येणाऱया हिवाळय़ात आणि सणासुदीच्या हंगामात लोकांचे संचलन वाढल्यास कोरोना रुग्णसंख्या वाढेल. त्यामुळे कोरोनाचेही प्रमाण वाढण्याची शक्मयता आहे. तसेच हिवाळय़ाच्या दिवसात कोरोना रुग्णांमधील लक्षणे आणि उपचार यामध्येही वेगळेपणा असेल, असे संकेतही तज्ञांकडून देण्यात आले आहेत.
हिवाळय़ात पारा कमी झाल्यामुळे अनेक लोकांना कोरोनाचा त्रास संभवू शकतो. विशेषत: या हंगामात श्वसनाची समस्या असलेल्या रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागेल. तसेच सर्दी आणि हृदयविकारसारखे आजार असलेल्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल. थंडीतील आजारांबरोबरच कोविड-19 विषाणूचा अतिरिक्त रोग सर्व आजारांवर वर्चस्व गाजवू शकतो. अशा परिस्थितीत व्याधीग्रस्तांना सावधानता बाळगावी लागणार आहे.
सर्दी : सामान्यत: खोकला, सर्दी, शिंक, घसा खवखवणे, डोकेदुखी, छातीत दुखणे अशा समस्या हिवाळय़ात बऱयाचदा टाळता येतील. परंतु या हिवाळय़ात आपण या किरकोळ रोगांकडे दुर्लक्ष करू नये कारण यावषी कोरोना देखील त्यांच्याशी संबंधित आहे. म्हणून स्वत:ची काळजी घेणे चांगले. हे आजार टाळण्यासाठी विश्रांती घेणे आवश्यक असून थंड पेये पूर्णपणे टाळावी लागतील.
फ्लू : फ्लू सर्वसाधारण पातळीवर असला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. फ्लू हा इन्फ्लुएन्झा नावाच्या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य श्वसन रोग आहे. फ्लूमुळे शरीरावर वेदना, घसा खवखवणे, ताप, डोकेदुखीचा त्रास होतो. या आजाराची सर्व लक्षणे देखील कोविड-19 ची लक्षणे आहेत. थंड हवामानात सर्वांनाच सर्दी आणि फ्लूपासून स्वतःचा बचाव करावा लागेल.
घसा खवखवणे : हिवाळय़ात घसा खवखवल्याने खूप त्रास होतो. घसा खवखवणे हा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो, ज्यामुळे रुग्णाला ताप येऊ शकतो. मुलांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे. यामुळे, अन्न किंवा पाणी गिळताना घशात अडचण येते. इतकेच नाही तर यामुळे डोकेदुखी, सूजलेल्या लिम्फ नोड्स, ताप देखील होऊ शकतो. हा त्रास टाळण्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे क्रमप्राप्त ठरेल.
ब्राँकायटिस : बहुतेकदा दोन वर्षांपेक्षा लहान मुले ब्राँकायटिसचे बळी असतात. ब्राँकायटिस एक श्वसन संक्रमण आहे ज्यास आरएसव्ही किंवा श्वसन रोगाच्या विषाणूमुळे होतो. फुफ्फुसांना सूज येणे, श्वास घेण्यास अडचण यासारखे लक्षणांचा समावेश आहे. या आजाराने ग्रस्त झालेल्या रुग्णाला हलका ताप, नाकाचा त्रास, घरघर आणि खोकला असू शकतो.
न्यूमोनिया : न्यूमोनिया हा आजार कोरोनाच्या लक्षणांमध्ये गुंतलेला आहे. न्यूमोनियामुळे अनेक कोरोना रुग्णही मरण पावले आहेत. न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग आहे जो हिवाळय़ामध्ये सामान्य असतो. हा जीवाणूमुळे होणारा आजार असून तो सौम्य किंवा तीव्र असू शकतो. न्युमोनियाची तीव्रता कमी असल्यास घरीच उपचार करता येतात. मात्र रुग्णाला सतत सर्दी किंवा जास्त ताप येत असेल तर डॉक्टरांना भेटणे अत्यावश्यक आहे.
दिवसात 4 हजार रुग्ण
जर्मनीने गुरुवारी रात्री जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात संसर्ग चिंताजनक पातळीवर पोहोचू लागला आहे. एका दिवसात 4 हजाराहून अधिक रुग्ण आढळल्याने चिंतेचे ढग अधिकच गडद झाले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी बर्लिन आणि फ्रँकफर्टमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
फ्रान्स : संक्रमणाला गती
युरोपियन देशांपैकी फ्रान्समध्ये जास्त संसर्ग दिसून येत आहे. 24 तासात येथे एकूण 18 हजार 746 नवीन प्रकरणे नोंदली गेली. सकारात्मक चाचणी निकालाचा दर 9.1 टक्क्मयांनी वाढविण्यात आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे मागील महिन्यापेक्षा ती 5 टक्के जास्त आहे. गेल्या महिन्यात हा दर 4.5 टक्के होता.
कोरोनातून बरे झालेल्यांना ‘फायब्रोसीस’चा धोका
कोरोना आजारातून बाहेर आल्यानंतर कोरोना रुग्णांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये ‘फायब्रोसीस’ म्हणजेच फुफ्फुसाचे इन्फेक्शन मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहे. फुफ्फुसाचे इन्फेक्शन अनेक रुग्णांना होत असून 10 ते 20 टक्के रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजारामध्ये रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र मोठय़ा प्रमाणात त्रास जाणवतो. तसेच कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. या रुग्णांना श्वास घेताना त्रास होणे, धाप लागणे, खोकला येणे, थकवा जाणवणे यांसह श्वसनाचा त्रास देखील होतो. त्यामुळे पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता आहे.
पाळीव प्राण्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग ?