चिपळुणातील दादर-देऊळवाडीतील घटना, जखमीच्या प्रकृतीत सुधारणा
चिपळूण
सख्ख्या भावाकडे दुचाकीची चावी मागितली असता ती न दिल्याने संतापलेल्या मद्यधुंद भावाने त्यच्यावर चाकूने मानेवर हल्ला केल्याची घटना नुकतीच दादर-देऊळवाडी येथे घडली. या हल्ल्यानंतर हल्लेखोराने तालुक्यातील तिवरेमार्गे महाबळेश्वरला पायी पलायन केले आसे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा गतीमान केली आहे. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या भावाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
सागर पोपट चव्हाण (दादर-देऊळवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे. या बाबतची फिर्याद प्रवीण पोपट चव्हाण (20, दादर-देऊळवाडी) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा मद्यधुंद अवस्थेत प्रवीण याच्याकडे येऊन त्यास बाहेर जायचे असल्याने दुचाकीची चावी मागत होता. तेव्हा त्यास गाडीमध्ये पेट्रोल नसून पेट्रोल पंपही बंद असल्याचे प्रवीणने त्यास सांगितले. मात्र ते काहीही ऐकून न घेता प्रवीण याला सागर याने शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे प्रवीण याने कादवड येथे रहात असलेल्या त्याचा दोन नंबरचा भाऊ प्रशांत यास फोन लावून बोलावून घेतले. त्यानेही त्या ठिकाणी येऊन सागर यास समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दारु प्यायलेला असल्याने तो काही ऐकायला तयार नव्हता. यावेळी सागरने प्रविण याला हाताने मारहाण केली. तसेच खिशातील चाकूने त्याच्या मानेवर वार करुन जखमी केली.
यानंतर जखमी अवस्थेत प्रवीणला प्रशांत व प्रथमेश यांनी तालुक्यातील दादर येथील सरकारी दवाखान्यात नेले व पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. या हल्ल्यानंतर हल्लेखोर सागर याने तालुक्यातील तिवरेमार्गे थेट महाबळेश्वरला पायी पलायन केले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी तपास सुरु केला असून सोमवारी त्याला ताब्यात घेण्याची शक्यता शिरगाव पोलिसांनी वर्तवली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फेजदार दाभोळकर करीत आहेत.
.









