चिपळूण
रविवारी गस्तीवरील पोलिसांनी जंगली प्राण्याची शिकार करण्याच्या इराद्याने बंदूक घेऊन जाणाऱया सातजणांना पकडल्यानंतर शिकारीची हौस त्यांना चांगलीच नडली आहे. यातील काहीजण हे बँकेत नोकरीस असून ते उच्चशिक्षित आहेत. विशेष म्हणजे एकाच्या वडिलांची शेती परवाना बंदूक आहे. दरम्यान, एकूण 10पैकी अन्य तिघेजण अद्याप गायब असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
रविवारी शिरवली फाटा येथे आदित्य अनंत चव्हाण, अमर सदाशिव चव्हाण, संकेत अनंत चव्हाण, चेतन सदानंद रसाळ, सोहम कैलास कदम, सागर अशोक वाघमारे हे सर्वजण विनापरवाना बंदुकीसह टाटा सुमो गाडीने शिकारीच्या इराद्याने जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या सर्वांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील अमर याच्या वडिलाची ही शेती परवाना बंदूक आहे. त्यांची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. यातील काहीजण उच्चशिक्षित असून ते मुंबई येथे बँकेत नोकरीस आहेत. ते मुळचे शिकारी नसून हौशेने ते शिकारीसाठी गेले आणि पोलिसांना सापडले.
तसेच दुसऱया घटनेत मिरवणे-शिरवली बायपास कच्चा रोड परिसरात मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नीलेश अशोक लाड, राजेश सत्यवान लाड, तेजस सत्यवान लाड, यश (पूर्ण नाव माहिती नाही) हे चारजण बोलेरो मॅक्स पिकअप गाडी घेऊन विनापरवाना बंदुकीसह जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले. यातील नीलेश वगळता अन्य तिघेजण अद्याप गायब झाले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मन्सूर मणेर करीत आहेत.









