प्रतिनिधी / कोल्हापूर
राधानगरी विधानसभा कार्यक्षेत्रातील वन विभागाच्या विकासकामात घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. त्यानुसार संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मुख्य वनसरंक्षक यांना दिले आहेत.
वन्यजीव विभाग व प्रादेशिक वन विभागामार्फत राधानगरी मतदारसंघात झालेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व जिल्हा नियोजन अधिकारी अशी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीने या कामांची चौकशी सुरु केली. या समितीने 2014 ते 2019 या कालावधीत केलेल्या 122 कामांपैकी 33 कामांची पाहणी केली. यातील 26 कामांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
या कामात अंदाजपत्रकात समाविष्ट केलेल्या साहित्याऐवजी कमी दर्जाच्या साहित्याचा वापर, अंदाजपत्रकातील साहित्य आणि वापरलेले साहित्य यांच्या परिमाणात तफावत, मोजमाप पुस्तकातील नोंदी प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी कमी प्रतीच्या निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे दिसून आले आहे. तसा अहवाल या समितीने जिल्हाधिकारी रेखावार यांना दिला आहे. या अहवालानुसार सर्व दोषी अधिकारी, कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करावी, तसेच दोषी व जबाबदार ठेकेदारांकडून देण्यात आलेल्या जादा रकमेची वसुली करावी, असे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले आहेत.









