दफनविधी उरकून परतताना सामाजिक अंतराचे केले होते उल्लंघन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन जारी आहे. सामाजिक अंतर सक्तीने पाळण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. तरीही एका रुग्णवाहिकेतून 25 जणांची वाहतूक करण्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला असून यासंबंधी 27 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे आदी अधिकारी शनिवारी रात्री राणी चन्नम्मा चौक परिसरात बंदोबस्तासाठी उभे होते. त्यावेळी एक रुग्णवाहिका त्यांच्यासमोर आली. पोलिसांनी आतील गर्दी पाहून ती अडविली.
या रुग्णवाहिकेत 25 जणांना कोंबण्यात आले होते. कॅम्प येथील एका रहिवाशाचा दफनविधी उरकून घरी जात असल्याचे उत्तर रुग्णवाहिकेतील लोकांनी दिले. यामधील बहुतेक जणांनी मास्कही परिधान केले नव्हते. एका आसनावर दोघे-दोघे बसले होते. ही परिस्थिती पाहून पोलीस अधिकाऱयांना धक्काच बसला.
एसीपी नारायण बरमणी यांनी रुग्णवाहिका चालकाला धारेवर धरले. ‘तुमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही रात्रंदिवस रस्त्यावर उभे जीवाची पर्वा न करता सेवा बजावत आहोत. तुम्ही मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून वागत आहात’, अशा शब्दात त्यांना तंबी दिली. त्यानंतर ही रुग्णवाहिका मार्केट पोलीस स्थानकात नेण्यात आली.
पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. केए 22, डी 0888 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा चालक अब्दुलखादर महंमदगौस चंदगडकर (रा. काकतीवेस) व रुग्णवाहिकेचा मालक अब्दुलरऊफ अब्दुलगफार बागेवाडी (रा. उज्ज्वलनगर) या दोघा जणांसह एकूण 27 जणांविरुद्ध भादंवि 143, 147, 188, 269, सहकलम 149 आणि संसर्गजन्य रोगप्रतिबंधक कायदा 1897 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









