घरोघरी आरोग्य तपासणी,साडवली क्वॉरंटाइन सेंटरचे पूर्णत:निर्जुंतूकीकरण
वार्ताहर / देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथील कोरोना बाधीत महिलेल्या संपर्कात आलेल्या 34 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आलें आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत घरोघरी जावून प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तर कोरोना बांधित महिलेला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सुहास थोरात यांनी दिली.
संसर्ग होवू नये म्हणून येथील ग्रामकृती दलाला अधिक सतर्क करण्यात आले आहे. तसेच आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोरोना बाधित व्यक्ती आणखी किती जणांच्या संपर्कात आली याचा मागोवा घेतला जात आहे. सध्या तरी 34 जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. वरिष्ठ स्तरावरील अधिकारी गावाला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. उगवतीवाडी, मधलीवाडी, गुरववाडी, करंडेवाडी, बौध्दवाडी, सतरंबेवाडी हा 3 कि.मीचा परिसर पूर्णता सील केला गेला आहे.
तसेच गाव परिसर निर्जंतुकीकरण करावा अशी सूचना तहसिलदार सुहास थोरात यांनी केली आहे. सामाजिक अंतर राखा, घरातच रहा, सुरक्षित रहा असा सावधानतेचा इशारा सील करण्यात आलेल्या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून देण्यात आला आहे. निवे प्राथमिक आरोग्य केंद्राची पूर्ण टीम तसेच तालुका आरोग्य अधिकारी बामणोली गाव परिसरावर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक घरी तपासणी केली जात आहे. बामणोली गावापासून मार्लेश्वर तिठा ते खडीकोळवण येथील पपईबाग परिसरापर्यंतचा परिसर सील केला गेला आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस, शिक्षक यांच्यामार्फत घडामोडीचा कानोसा घेतला जात आहे. सील करण्यात आलेल्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी देवरुख, रत्नागिरी व मुर्शी चेकपोस्ट येथील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
बामणोली गावात कोरोना रूग्ण सापडल्यानंतर येथील परिसर सील करण्यात आल्यावर प्रशासनाने यासाठी खास रूपरेषा तयार केली आहे. यात बफ्ढरझोनमध्ये मारळ गावातील 5 वाडय़ांचा तर इंटरनल झोनमध्ये बामणोली गावातील 7 वाडय़ांचा समावेश करण्यात आला आहे. बामणोली गावाची लोकसंख्या 562 असून मारळ गावातील 198 घरातील 450 लोकांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांना गावातून बाहेर जाण्यास वा बाहेर गेलेल्यांना गावात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान काल बामणोलीतील क्वॉरंटाइन केलेली महिला साडवली येथे पॉझीटीव्ह सापडल्याने या क्वॉरंटाइन सेंटरचे पूर्णतः निर्जुंतूकीकरण करण्यात आले आहे. रूग्णाचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून संपूर्ण तालुक्यातच सतर्कता बाळगण्यात येत आहे.









