एपीएमसीमधील व्यापाऱयांची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी : व्यापाऱयांचे अर्धनग्न आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
एपीएमसी मार्केटयार्ड असताना बेकायदेशीररित्या भाजीमार्केट सुरू करण्यास परवानगी दिल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही घरे गहानवट ठेवून कर्ज काढले आहे. आता ते कर्जदेखील फेडणे अवघड झाले आहे. तेंव्हा आम्हाला न्याय द्या, अन्यथा विष द्या… म्हणत एपीएमसीमधील व्यापाऱयांनी अर्धनग्न होऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. न्याय देण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना दिले.
एका ठिकाणी मार्केट असताना दुसऱया मार्केटला परवानगी देणे योग्य आहे का? महत्त्वाचे म्हणजे या प्रकाराला जिल्हा प्रशासन काहीच करू शकत नाही, हे दुर्दैव आहे. आम्ही व्यवसाय करण्यासाठी अनेक बँकांमधून कर्ज घेतले आहे. सरकारच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आम्ही त्याठिकाणी गाळे घेतले. मात्र आता त्याठिकाणी ग्राहक खरेदी-विक्रीसाठी येत नाही. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे. गेल्या 54 दिवसांपासून त्यासाठी एपीएमसीमध्ये आंदोलन करत आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे.
बेकायदेशीर मार्केटवर कारवाई करतो, असे आश्वासन अनेकवेळा देण्यात आले. मात्र अजून त्या मार्केटवर कारवाई करण्यात आली नाही. एक मार्केट असताना दुसरे मार्केट सुरू करणे हे योग्य आहे काय? प्रशासनामुळे आम्ही अडचणीत आलो आहे तेंव्हा आम्हाला विष द्या, अशी भावनिक मागणी देखील यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी सतीश पाटील, जी. सी. कोडोली, ए. एफ. चौगुले, अजित कलमनी, संजय स्वामी, जे. एम. सनदी, विजय पाटील, एस. सी. पाटील, एम. एन. होसूरकर, एम. वाय. पाटील, व्ही. आय. हुंचन्नावर, व्ही. बी. झडमाळे यांच्यासह क्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.