5-6 नौकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहीती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
तौक्ते चक्रीवादळाचा फटका संपूर्ण जिल्हय़ाला जबरदस्त तडाखा बसला आहे. निसर्ग वादळातून सावरण्याआधीच जिल्ह्ला बसलेला हा तडाखा दीर्घकालीन परिणाम करणारा आहे. या वादळात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले, वीजपुरवठा खंडीत झाला, वाहतुक व्यवस्था कोलमडली, शेते व बागायतींचेही मोठे नुकसान झाले. सलग दोन दिवस जोरदार वारे व मुसळधार पावसाने जिल्हय़ाला अक्षरशः झोडपून काढले. केरोनामुळे आधीच विस्कळीतपणा असताना या वादळाने उन्मळून टाकलेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी तालुक्यात या वादळाचा मोठा फटका मिरकरवाडा परिसराला बसला आहे. मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील कांचन ओशियन व्हय़ू समोरील भिंत कोसळली. या भिंतीखाली अनेक गाडय़ा गाडल्या गेल्याने नुकसान झाले. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात वादळी वाऱयाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. आबां व्यवसायाचे या नैसर्गिक आपत्तीत पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. घरे, शाळा, धार्मिक स्थळे व वाहनांचे विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. या वादळाचा मान्सून व पावसाळी शेतीच्या वेळापत्रकावर काय परिणाम होतो याबद्दलही अनेकजण काळजीत पडले आहेत.
जयगडमध्ये बोटीला जलसमाधी, 5-6 नौकांचे नुकसान
चक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदर येथे एका मच्छीमाराची नांगरून ठेवलेली बोट रविवारी रात्रीच्या सुमारास बुडाली आहे. याशिवाय राजापूरमधील 3 नौकांचे, जयगड येथे 1 तर मिरकरवाडय़ामध्ये काही नौका एकमेकांना आदळल्यामुळे नौकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मत्स्य विभागाकडून उपलब्ध झाली आह़े मात्र संपर्क तुटल्यामुळे नुकसानग्रस्त नौका व नुकसानाचा नेमका आकडा पुढील एक-दोन दिवसात स्पष्ट होणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त ना. वि. भादुले यांनी दिल़ी चक्रीवादळामुळे नौकांचे नुकसान झाले असले तरी जीवीतहानीचे कोणतेही वृत्त नाही. मिरकरवाडा, मिऱया, काळबादेवी, जयगड, सैतवडे आदी ठिकाणी मोठया संख्येने परप्रांतीय नौकांनी आश्रय घेतला आह़े वादळाच्या इशाऱयानंतर सर्व बेटी किनाऱयावर परतल्या मात्र सोसायटय़ाच्या वाऱयाने व खवळलेल्या समुद्राने किनाऱयावर नांगरून ठेवलेल्या अनेक बोटींचे नुकसान झाले आहे.
रस्तेवाहतुकीत अडथळा

जिल्हय़ातील अनेक रस्त्यांवर वादळाने पडलेली झाडे व मोडलेल्या फांद्या यामुळे अडचणी निर्माण झाल्या. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता तहसिलदार कार्यालय, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या मदतीने झाडे, फांद्या हटवण्याचे काम युध्दपातळीवर करण्यात आले. कोल्हापूर मार्गावर खानू येथे झाड कोसळल्याने महामार्ग सुमारे अर्धा तास ठप्प होता. परशुरराम घाटातही वाहतुक काही काळ ठप्प होती. महामार्गांसह अनेक अंतर्गत रस्त्यांवरही झाडे पडल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. प्रशासन व स्थानिकांच्या प्रयत्नांनी बहुतांश ठिकाणी सोमवारी सायंकाळपर्यंत रस्ते वाहतुक सुरळीत झाली होती.
रत्नागिरी एस.टी विभागाला फटका
रत्नागिरी एसटी विभागालाही चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. गुहागर, रत्नागिरी डेपोतील शेडचे पत्रे उडाले. विभागीय कार्यालयाच्या पॅसेजमध्ये पाणीच पाणी साठले होते. कार्यशाळेत झाडे कोसळल्यानेही नुकसान झाले आहे. रत्नागिरी-मिरजोळे याठिकाणी अनेकांच्या बागायतो, घरे, शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले आहेत. हातातोंडांशी आलेल्या आंब्याचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असून विद्युतपुरवठा खंडित आहे. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून प्रशासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मिरजोळे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संदीप कृष्णा नाचणकर यांनी केली आहे.
राजापुरात 3 जखमी वादळाचा तालुक्याला जोरदार तडाखा
तौक्ते चक्रीवादळाने राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. किनाऱयालगत असलेल्या अनेक गावांमध्ये घरे, गोठय़ांची पडझड होऊन मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिले आहेत.
तालुक्यात मंदरूळ येथे घराची भिंत कोसळून 3 जण जखमी झाले. अनिल तुळाजी मासये 42, पत्नी अस्मिल अनिल मासये 36 व मुलगी श्रावणी अनिल मासये 13 यांचा समावेश आहे. पहाटे साडेतीन वाजता संरक्षक भिंत पडवीवर कोसळून घरात झोपेलेले तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लांजा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लांजात महामार्गाला नदीचे स्वरूप

चक्रीवादळासह दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाने नदीचे स्वरूप धारण केले होते. महामार्गावर मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी आल्याने वाहन चालकांना रस्ता दिसेनासा झाल्याने किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या. रविवारी व सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकार उडवला. लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत असल्याचा फटका वाहन चालक व नागरिकांना बसला. जोरदार पावसामुळे शहरातील महामार्ग पूर्णतः पाण्याखाली गेला होता. महामार्गाच्या शेजारी गटारे नसल्याने गटारांचे पाणी महामार्गावरून वाहत होते. लांजा शहरात महामार्गाने पावसाच्या पाण्याने नदीचे स्वरूप धारण केले होते. त्यामुळे वाहने चालविणे धोकादायक ठरत होते. महामार्ग पाण्याने तुडुंब भरल्याने एक मारुती ओमनी गाडी गटारामध्ये कलंडली. लांजा बाजारपेठेतही पाणी शिरले होते.
संगमेश्वर तालुक्यात साडेसात लाखांचे नुकसान
देवरुख वार्ताहरने कळवल्यानुसार संगमेश्वर तालुक्यात तब्बल साडे सात लाखांच्या नुकसानाची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद सोमवारी सकाळी 12 पर्यंतची असून हा आकडा आणखी वाढणार आहे. यात घरे, गोठे, सार्वजनिक सभागृह, शौचालये यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले असून 24 तास उलटुनही संगमेश्वर तालुका अंधारातच आहे. देवरुख तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील 45 घरांचे सुमारे 6 लाख तर 4 गोठे, 1 सार्वजनिक पाण्याची टाकि, 1 रिक्षा, 1 शेतघर, 1 शाळा , 2 शौचालय, साडवली दुध शितकरण केंद्र असे सगळे मिळून 7 लाख 53 हजार 650 रुपयांचे नुकसान झाले आहे.
चिपळुणात वादळी पावसाचा 83 घरांना तडाखा!
चिपळूण तालुक्यात वादळात ठिकठिकाणी वृक्ष कोसळून आणि छप्परे उडून तब्बल 83 घरांसह 20 सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. दरम्यान रविवारी दुपारपासून खंडीत झालेल्या वीजपुरवठयामुळे शहरासह ग्रामीन भागातील बहुतांशी भागातील पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे.
वादळाचा आणि त्यांनतर रात्रभर कोसळलेल्या पावसाचा मोठा फटका तालूक्याला बसला. मालदोली, मुर्तवडे, कळकवणे येथील स्मशानशेड, शिरगांव, खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगांव खुर्द ग्रामपंचायत, शासकीय गोदाम, आगवे पोस्ट कार्यालय, चिवेली, पेढांबे, दोणवली, ताम्हणमळा येथील मराठी शाळा, पेढांबे अंगणवाडी या सर्व शासकीय मालमत्तांचे कौले, पत्रे उडून नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासांत तालूक्यात शंभर मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
प्रशासनाने वहाळ, पेढांबे येथील कोविड केअर सेंटरमध्ये दोन दिवसांपूर्वीच नव्याने जनरेटर बसवण्यात आले. तर कामथे उपजिल्हा रूग्णालयात जनरेटर व्यवस्था सुसज्ज ठेवल्याने शासकीय कोविड सेंटरमध्ये खंडीत वीजपुरवठयाचा कोणताही परिणाम झाला नाही. तर खासगी कोविड सेंटरमध्येही जनरेटर व्यवस्था करण्यात आलेली होती.
अर्ध्या शहरासह ग्रामीण पाणीपुरवठयावर परिणाम
या वादळामुळे शहरासह ग्रामीण भागात वीजखांब जमिनदोस्त झाले असून वीजतारा तुटून पडल्या आहेत. त्यामुळे गेले दोन दिवस वीज गायब झाली असून ती टप्प्याटप्याने सुरू करण्याचा प्रयत्न महावितरणे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र काम करून करीत आहेत. मात्र याचा परिणाम शहरासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठयावर झाला आहे. अर्ध्या शहराला खेर्डी येथून पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे या परिसरात वीज नसल्याने नागरीकांना पाणी मिळालेले नाही. मात्र सर्ध्या शहराला गोवळकोट येथून पाणी दिले जात असून येथे जनरेटर असल्याने गोवळकोट, पेठमाप, मुरादपूर, उक्ताड अशा अर्ध्या शहराला नियमित पाणी दिले जात आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडला असून सध्या पावसाच्या पाण्याचा आधार घेतला जात आहे. तसेच शहरातील अनेक इमारतींमध्येही पंप बंद राहिल्याने पाण्याचा तुटवडा भासत आहे.
गुहागर बायपास रस्ता वाहतुकीसाठी खुला
रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसात चिपळूण-गुहागर बायपास मार्गावर पहाटेच्या सुमारास झाड उन्मळून पडलं. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र याबाबतची माहिती मिळताच युवासेनेच्या कार्यकर्त्यानी घटनास्थळी जात सकाळी सात वाजल्यापासून हे झाड बाजूला करण्याची मोहीम हाती घेतली.
खेडमध्ये चार घरांची पडझड, तालुका अंधारात
रविवारी रात्रीपासून तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. खारी, पन्हाळजे, नांदिवली व अन्य गावात घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. वादळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला आहे. छतावरील पत्रे तसेच गोठे कोसळून हानी झाली आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा उपलब्ध झालेला नाही. सायंकाळच्या सुमारास झालेल्या सोसाटय़ाच्या वाऱयामुळे दस्तुरी येथे वीजेचे खांब उवडले. यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने रात्रभर नागरिकांना अंधारातच चाचपडावे लागले. वीजेअभावी शहराच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला. सोमवारी 11 वाजल्यानंतर पावसाने काहीशी उसंत घेतली.
दापोलीत धुमशान, नागरिकांचे हाल
दापोली प्रतिनिधी ने कळवल्यानुसार रविवारी दापोलीत अनेक झाडे पडल्याने रस्ते वाहतूक खंडित झाली होती. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने खंडीत झालेला वीज पुरवठा सोमवारी सायंकाळ पर्यंत सुरळीत झाला नव्हता. रविवारी दुपारनंतर दापोली व मंडणगड दोन्ही तालुक्यांचा वीज पुरवठा बंद करून ठेवण्यात आला होता. शहरातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पुढे बुरोंडी रस्त्यावर मोठा वृक्ष पडल्याने बुरोंडीकडे जाणारी वाहतूक खंडित झाली होती. टाळसुरे मोकलबाग या ठिकाणी मोठे फणसाचे झाड रस्त्यावर पडल्याने दापोली खेड मार्ग काही काळ बंद होता. जालगाव लष्करवाडी येथील मंदिरालगत पडलेले झाड ग्रामस्थांनी श्रमदानाने दूर केले. जालगाव ब्राह्मणवाडी येथे संजय इचले यांच्या घरावर रविवारी सायंकाळी काजूचे झाड उन्मळून पडल्याने त्यांच्या घराच्या छताचे नुकसान झाले. गिम्हवणे वणंद फाटा येथे मोठे झाड पडल्याने वाहतूक बंद झाली होती. दापोली वडाचा कोंड येथील नाले तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. पोलीस स्थानकातील पाण्याच्या टाकीवर आंब्याचे झाड पडल्याने टाकीचे नुकसान झाले. पॅमिली माळ येथे पिझ्झा सेंटरवर आंब्याचे झाड पडल्याने या सेंटरच्या शेडचे नुकसान झाले. दाभोळ भंडारवाडा येथे अभिजित पारकर यांच्या घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले.
दापोली प्रशासनाने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी कच्च्या घरात राहणाऱया नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले होते. सोमवारी सायंकाळपर्यंत दापोली शहराकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले केले होते. दापोली शहरातील काळकाई कोंड येथील पाण्याच्या टाकीसमोर आंब्याचे झाड दापोली शहराला वीज पुरवठा करणाया मुख्य वाहिनीवर सोमवारी सकाळी कोसळले. यामुळेही वीजवाहिनी तुटली व विजेचे खांब वाकडे झाले होते.
मंडणगडात 65 घरांचे नुकसान मंडणगड तालुक्यात ताशी 80 ते 90 किमी वेगाने वाहणाऱया वाऱयाने सुमारे बारा तास मंडणगड तालुक्यात थैमान घातले. यात समुद्र किनारी व खाडी पट्टय़ातील गावांमध्ये सुमारे 60 घरे, गोठे, शेडचे अंशतः व किरकोळ नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारपर्यंत सर्वांचे पंचनामे पूर्ण होणे अपेक्षित असून नुकसानीबाबत नेमकी माहिती उपलब्ध हेणार आहे.









