मुंबई \ ऑनलाईन टीम
तौक्ते चक्रीवादळाचा राज्यातील काही जिल्ह्यांना तडाखा बसला होता. या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेचे नुकसान झाले. तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदतीचे वाटप करण्यासाठी 170 कोटी 72 लाख 73 हजार रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलाय. हा निधी तात्काळ वितरणाच्या सूचना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वादळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी 4 दिवसांचा कोकण दौरा केला होता.
वडेट्टीवारांनी 20 ते 22 मे रायगडमधील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कु डाळ, मालवण, वेंगुर्ला तालुक्यांचा तीन दिवस दौरा करून लोकांशी थेट संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली होती. नागरिकांसोबत संवाद साधून वादळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. तो शब्द सरकारने पाळल्याचं यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
तौक्ते चक्रीवादळामुळे बहुवार्षिक पिकांचे नुकसान, मृत जनावरांसाठी मदत, पूर्णतः नष्ट किंवा अंशतः पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरे, मत्स्य बोटी व जाळ्यासाठी अर्थसहाय्य, मत्स्यबीज, शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार व टपरीधारक यांना नुकसानीसाठी मदत व इतर अनुदेय बाबींकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 170 कोटी 72 लाख 73 हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सदर निधी तातडीने वाटप करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.
Previous Articleशितपवाडीत अखेर कोरोना लसीकरण
Next Article ब्राझीलकडून ‘कोवॅक्सिन’ लस खरेदीला स्थगिती








