प्रतिनिधी / सांगली
तोलाईच्या प्रश्नावरून मार्केट यार्डात निर्माण झालेला वाद शुक्रवारी चिघळला. चोर म्हटल्याच्या निषेधार्थ व्यापाऱयांनी बंद पाळला. हमालांनीही व्यापाऱयांच्याविरोधात मोर्चा काढून घोषणाबाजी करत चेंबर ऑफ कॉमर्ससमोर शंखध्वनी केला. त्यामुळे यार्डात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, व्यापाऱयांनी हमालांना विरोधात बैठक घेत, जोपर्यंत हमाल संचालक माफी मागत नाहीत तोपर्यंत व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. कोणाचाही अपमान केला नाही राजकारणासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी व्यापारी बिनबुडाचे आरोप करून दिशाभूल करीत आहेत. या बंदमुळे यार्डातील सुमारे तीन ते चार कोटीची उलाढाल ठप्प झाली. दरम्यान, रात्री उशीरा या वादावर तोडगा निघाल्याने शनिवारी सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत.
यार्डात काम करणाऱया तोलाईदारांना तीन ऑक्टोबर 2019 पासूनची तोलाई मिळावी, यासाठी तोलाईदार संघटनेने बाजार समितीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. 37 व्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. आंदोलनावर तोडगा निघत नसल्यामुळे बाजार समितीमधील हमाल प्रतिनिधी संचालक बाळासाहेब बंडगर यांनी टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे दोन आठवडय़ापूर्वी 115 व्यापाऱयांना बाजार समिती प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. नोटिसांची मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीमध्ये आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी रात्री जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. सभापती दिनकर पाटील, संचालक बाळासाहेब बंडगर, व्यापारी संचालक मुजीर जांभळीकर, तसेच हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदूम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा आदी उपस्थित होते.
ऑक्टोबरपासूनच तोलाई मिळावी, अशी मागणी तोलाईदारांच्यावतीने करण्यात आली. तेव्हा व्यापारी प्रतिनिधी मुजीर जांभळीकर यांनी आम्ही काय चोऱया करून तोलाई द्यायची काय? असा सवाल केला. त्या कारणावरून वाद चिघळला. बैठकीत गोंधळ उडाला. संचालक बंडगर यांनी व्यापारी चोर आहेत की नाही ते सिद्धच करून दाखवतो, असे आव्हान दिले. त्यावरून शाब्दीक चकमक उडाली. त्यामुळे बैठक तोडग्याविना संपली.
निषेधार्थ व्यापाऱयांचा बंद
बैठकीस बोलवून व्यापारी संचालकांना चोर म्हणून अर्वाच्या भाषेत वक्तव्य केले. व्यापारी संचालक जांभळीकर यांना तसेच व्यापाऱयांना चोर म्हटल्यामुळे संतप्त झालेले व्यापारी शुक्रवारी सकाळी चेंबर ऑफ कॉमर्ससमोर एकत्र आले. त्यांनी बैठकी घेऊन निषेध नोंदवला. हमाल संचालक बंडगर हे व्यापाऱयांची माफी मागून राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत मार्केट यार्डातील व्यापार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
हमालांचा मोर्चा, घोषणाबाजी
इकडे तोलाईदार सभेचे आज 37 व्या दिवशीही धरणे आंदोलन सुरूच होते. व्यापायांनी बंद पुकारल्यामुळे हमालांनी संतप्त होत बाजार समितीसमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. मोठय़ा संख्येने शेकडो हमालांनी दुचाकी रॅली काढली, जाताना बाजारसमोर शंखध्वनी केला. राजकारणासाठी व्यापारी बिनबुडाचे आरोप करून दिशाभूल करीत आहेत. या निषेधार्थ शनिवारी हमालांच्यावतीने बंदचा इशारा देण्यात आला आहे. हमाल आणि व्यापारी आमने-सामने आल्याने मार्केट यार्डात दिवसभर तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
व्यापाऱयांचा अपमान सहन करणार नाही : शहा
देशात कोठेही पॅकिंग मालावर तोलाई घेतली जात नसून केवळ सांगलीतच दादागिरी सुरु असल्याचा आरोप चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी केला. पॅकिंग मालावर तोलाई नको यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल असून त्यावर सुनावणी सुरू आहे. मूळ विषयाला बगल देऊन आम्हाला चोर म्हटल्यामुळे चेंबरतर्फे निषेध असून व्यापाऱयांचा अपमान सहन केला जाणार नाही. तोलाई, हमाली, सेस व्यापारी भरत असून सर्व घटक व्यापाऱयांशी संबंधित आहेत. व्यापार वाढला तरच उत्पन्न वाढणार आहे. व्यापारी कधीही सेस बुडवत नाहीत. त्यांना हवे असेल तर जकात नाक्यावरच सेस वसूल करावी, मग मार्केट कमिटीत संचालक शोधून सापडणार नाहीत.
माफी मागण्याचा प्रश्नच नाही ः मगदूम
व्यापाऱयांना कोणताही चुकीचा शब्द वापरला नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष विकास मगदूम यांनी स्पष्ट केले. आम्ही तोलाईसाठी भांडत आहोत. आमचा अपमान करणाऱया व्यापायांनीच आमची माफी मागावी. मार्केट यार्डातील बहुतांशी व्यापारी सेस बुडवित आहेत. तोलाई दिली तर सर्व व्यापार एक नंबरचा होईल. या कारणांमुळेच व्यापारी रोखीने तोलाई द्यायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाऱयांनी संप पुकारला त्याचा काहीही फरक पडत नसल्याचेही यावेळी मगदूम यांनी स्पष्ट केले.
रात्री उशीरा तोडगा निघाला
शुक्रवारी रात्री बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांच्या उपस्थितीत व्यापारी शिष्टमंडळ आणि हमालांचे शिष्टमंडळ यांच्याबरोबर मॅरेथॉन बैठक झाली. या दोन्ही शिष्टमंडळाने आपली बाजू रेटून लावली. परंतु मार्केट यार्ड सुरळीत सुरू राहण्यासाठी दोघांनीही एक-एक पाऊल मागे घेत शनिवारचा बंद रद्द केला. शनिवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी दिली.








