श्रीनगर / वृत्तसंस्था
लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर इश्फाक रशीद खान याचा खात्मा करण्यात अखेर शनिवारी सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. खान याच्यासह त्याचा साथीदार एजाज अहमद यालाही कंठस्नान घालण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये रणबीरगड येथे लष्करी जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत या कारवाईला यश आल्याचे सांगण्यात आले. यावेळी झालेल्या संघर्षात एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांकडून देण्यात आली. घटनास्थळावरून एके-47 रायफल व पिस्तूलसह अन्य शस्त्रसाठा व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या भागात लष्कराकडून शोधमोहीम सुरू होती.









