त्या प्रवासात जगावेगळे काही नव्हते. पण खूप झपाटय़ाने बदलत गेला. आता त्या प्रवासासाठी तो रस्ता वापरतात की नाही, ठाऊक नाही.
चाळीस वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले. बायकोचे सगळे नातेवाईक इंदोर आणि आसपास होते. मग एकदा तिकडे जायला निघालो. त्यावेळी पुण्याहून थेट रेल्वे नव्हती. खाजगी बसेस जास्त नव्हत्या. मग विश्वासातली म्हणून आपली लाल परी ऊर्फ एस. टी. निवडली. कचेरीतून रजा मंजूर झाल्यावर शिवाजीनगरला जाऊन रिझर्व्हेशन केले–म्हणजे एक एक रुपयाची दोन तिकीटे काढली.
संध्याकाळी धडपडत जाऊन दोघे बसमध्ये बसलो. मग स्वतःवर हसलो. कारण बस सुटली तेव्हा बसमध्ये आमच्यासह अवघे आठेक प्रवासी होते. आम्ही तिकिटे काढली. माणशी पासष्ट रुपये. शिरूरला एक जोडपं चढलं. अहमदनगरला जेवणासाठी बस थांबली तेव्हा पाचसहा प्रवासी. नंतर शिर्डीला जोडपं उतरून गेलं. बस मुंबई-आग्रा रस्त्याला केव्हा लागली ते समजलं नाही.
पहाटे बस सेंधवा इथे थांबली. आम्ही उतरलो तर रस्त्यावर डझनभर ठेलेवाले शेगडीवर ठेवलेल्या परातीत पिवळय़ाधम्म पोह्यांचे ढीग लावून उभे होते. अनेकांनी पोह्यांच्या शिखरावर गुलाबाची फुले किंवा हिरव्या मिरच्या खोचल्या होत्या. रस्त्यावर चारसहा बसेस उभ्या होत्या आणि ठेल्यांच्या पाठीमागे चवडय़ांवर बसून काही प्रवासी दंतमंजन करीत होते. वर्तमानपत्राच्या चौकोनी तुकडय़ांवर पोहे ऊर्फ पोव्हा खाऊन गोडमिट्ट चहा घेतला नि नंतर थेट इंदोरला पोचलो. येतानाच्या प्रवासात चहा-भजी-वडे देणारी सकाळ उजाडली ती शिर्डीच्या आवारात. सेंधवा-इंदौर भागातले पोहे ऊर्फ पोव्हा आपल्या पोह्यांपेक्षा निराळेच लागतात. त्यात कांदा नाममात्र असतो. बटाटे-मटार नसतात. फोडणीत मोहरीऐवजी जिरे-बडीशेप आणि वरून साखरेची मोठ्ठी चिमूट पेरलेली असते.
नंतरच्या दशकात हा प्रवास महाग आणि सुखकर होत गेला. खाजगी वातानुकूलित बसेस आल्या. अहमदनगरला जेवण झालं की अधेमधे उतरणाऱया प्रवाशांच्या मर्जीनुसार मध्यरात्री मालेगावला सनी हॉटेलसमोर, नंतर धुळे ऊर्फ धुलिया आणि पहाटे सेंधवा असे थांबे घेत. नवे प्रवासी घेत. खाजगी बसेस पुण्याहून सुटताना निम्म्या सीट्स रिकाम्या असत. पुढे येणाऱया प्रवाशांशी (बहुधा अनधिकृत) भाडेदरावरून घासाघीस चाले. इंदोरला मुख्य स्थानकावर पोचण्यापूर्वी हे सगळे प्रवासी नौलखा, पलासिया वगैरे चौकात उतरवले जात. काय रहस्य असेल ते असो.








