बैलहोंगल पोलीस स्थानकात अखेर एफआयआर दाखल : सांगलीच्या सराफाची रक्कम लुटली
प्रतिनिधी /बेळगाव
गद्दीकरविनकोप्प (ता. बैलहोंगल) जवळ महिंद्रा पिकअप अडवून मोठय़ा प्रमाणात रक्कम लुटल्याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांनी 5 कोटी रुपयांची लूट केल्याचे उघडकीस आले असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. ही रक्कम सांगली येथील एका सराफी व्यावसायिकाची आहे.
आटपाडी (जि. सांगली) येथील विकास विलास कदम (वय 38) यांनी रविवारी रात्री बैलहोंगल पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. इर्टिगातून आलेल्या पाच दरोडेखोरांनी 4 कोटी 97 लाख 30 हजार रुपये रोकड लुटल्याचे फिर्यादित म्हटले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगलचे पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी पुढील तपास करीत आहेत.
भा.दं.वि. 395 व शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा 1959 कलम 25 (ए) अन्वये पाच अज्ञात दरोडेखोरांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरहून बोलेरो पिकअपचा पाठलाग करून हा दरोडा घालण्यात आला आहे. शुक्रवार दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास गद्दीकरविनकोप्पजवळ ही घटना घडली असून जिल्हय़ातील आजवरचा हा मोठा दरोडा आहे.
उपलब्ध माहितीनुसार आटपाडी येथील विकास कदम यांचा सराफी व्यवसाय आहे. कोल्हापूर येथे लक्ष्मी गोल्ड नामक दुकान आहे. या दुकानात व्यवहार केलेले 4 कोटी 97 लाख 30 हजार रुपये कोल्हापूरहून उडुपीला पाठवायचे होते. बोलेरो पिकअप (केए 22, डी. 2333) मधून ही रक्कम उडुपीला पाठविताना दरोडा घालण्यात आला आहे.
4 कोटी 70 लाख रुपये पाच पोत्यांमध्ये भरण्यात आले होते तर 27 लाख 30 हजार रुपये एका पुट्टय़ाच्या बॉक्समध्ये घालण्यात आले होते. सचिन भानुदास ऐहोळे (रा. वाडेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर), महादेव रामचंद्र बनसोडे (रा. सोनेवाडी, ता. माण, जि. सातारा) हे दोघेजण महिंद्रा पिकअपमधून रक्कम घेऊन उडुपीला निघाले होते.
रक्कम घेऊन जाणारे वाहन हिरेबागेवाडीपर्यंत पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून आले. ‘हळ्ळीमने’ धाब्याजवळ केए 28 पी 6432 क्रमांकाच्या इर्टिगामधून पाच दरोडेखोर आले. त्यांनी बोलेरो पिकअप अडविण्याचा प्रयत्न केला. सचिन ऐहोळे पिकअप चालवत होता. आपले वाहन न थांबविता त्याने ते पुढे नेले. इर्टिगामधून दरोडेखोरांनी त्याचा पाठलाग केला. एम. के. हुबळीजवळ पुन्हा बोलेरो पिकअप अडविण्याचा प्रयत्न झाला.
पिस्तूल-चाकूचा धाक
महिंद्रा पिकअपला ओव्हरटेक करून ते अडविण्यात आले. इर्टिगामधून खाली उतरलेल्या दोघा जणांनी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून सचिन व महादेव यांना इर्टिगामध्ये बसविले व पिकअपचा ताबा दरोडेखोरांनी घेतला.
गद्दीकरविनकोप्पजवळ येऊन बोलेरो पिकअपमधील पैशांनी भरलेली पाच पोती व पुट्टय़ांनी भरलेला बॉक्स इर्टिगामध्ये भरण्यात आले. सचिन व महादेव यांच्याजवळील फोन व पिकअपची चावी काढून घेऊन दरोडेखोर तेथून निघून गेले.
बैलहोंगल पोलिसांकडून तपास सुरू
प्राथमिक माहितीनुसार कोल्हापूरहून पाठलाग करीत दरोडेखोरांनी रक्कम लुटली आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर बैलहोंगल पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. दरोडय़ाच्या घटनेनंतर तिसऱया दिवशी या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले असून दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.









