तेलंगणातील नागार्जुन सागर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सत्तारुढ तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), भाजप आणि काँग्रेससाठी एक अग्निपरीक्षाच ठरणार आहे. हे तिन्ही पक्ष या पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. 2023 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघातील आघाडी मिळविण्याच्या दृष्टीने तिन्ही पक्ष कार्यरत आहेत.
या मतदारसंघात 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. अनेक अन्य पक्षांचे उमेदवार आणि अपक्षही निवडणुकीच्या मैदानात आहेत, पण मुख्य लढत या तिन्ही पक्षांदरम्यानच आहे. टीआरएसचे आमदार नोमुला नरसिंहय्या यांचे मागील वर्षी डिसेंबरमध्ये निधन झाल्याने ही पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे.
भाजपने या मतदारसंघात पी. रवि कुमार यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसच्या वतीने के. जनरेड्डी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. रेड्डी 2018 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये पराभूत झाले होते. यापूर्वी रेड्डी हे येथे 7 वेळा आमदार राहिले आहेत.दुब्बाक विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक, ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर नागार्जुन सागर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळविणे काँग्रेसकरता आवश्यक ठरले आहे.
टीआरएसने या मतदारसंघात नोमुला भगत कुमार यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या मतदारसंघात 10 फेब्रुवारी रोजी एका प्रचारसभेला संबोधित केले होते.









