आधार-जन्मशी संबंधित माहिती संकलित : आंध्रप्रदेशातही मोहीम
वृत्तसंस्था/ हैदराबाद
देशाच्या अनेक भागांमध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीला (एनपीआर) विरोध असताना तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात एनपीआरची रंगीत तालीम पार पडली आहे. या प्रक्रियेदरम्यान कुठलीच नकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त झाली नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे. दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी 3 जिल्हय़ांमध्ये एनपीआरची रंगीत तालीम झाली आहे. तेलंगणाच्या निजामाबाद, वारंगल आणि मेहबूबनगर तर आंध्रप्रदेशच्या विजझयनग्राम, अनंतपूर आणि गुंटूर जिल्हय़ात ही प्रक्रिया पार पडली आहे.
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह मुस्लीम संघटनांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना एनपीआरशी संबंधित प्रक्रिया रोखण्याचे आवाहन केले आहे. एनपीआरच्या रंगीत तालिमीत देशातील 74 जिल्हय़ांमधील सुमारे 30 लाख लोक सामील झाले. यात त्यांच्या आईवडिलांचे जन्मस्थळ, अखेरचे वास्तव्यस्थान, आधार, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, पारपत्र, मोबाईल क्रमांक, वाहन चालविण्याचा परवाना समवेत 21 मापदंडांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले.
कुठल्याही व्यक्तीने नकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. सप्टेंबर ते ऑक्टोबर 2019 दरम्यान पार पडलेल्या या प्रक्रियेला कुणीच विरोध केलेला नाही. सर्वांनी स्वमर्जीने माहिती उपलब्ध केल्याचे अधिकाऱयाने सांगितले आहे.
पडताळणीसाठी दस्तऐवज तयार ठेवण्याची सूचना अधिकारी पोहोचण्यापूर्वीच संबंधित कुटुंबांना दिली जात होती. अनेक कागदपत्रे उपलब्ध करावी लागतील, असा गैरसमज लोकांमध्ये आहे. पण प्रत्यक्षात स्वतःच्या मर्जीनुसारच माहिती देण्याची तरतूद यात असल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे.
यापूर्वीही अंमलबजावणी
तेलंगणात 2015 मध्येही सर्व जिल्हय़ांत एनपीआरचे अद्ययावतीकरण करण्यात आले होते. 2010 मध्येही एनपीआर प्रक्रिया राबविण्यात आली होती. तर 2015 मध्ये केवळ 15 निकषांवर माहिती गोळा करण्यात आली होती. वर्तमान एनपीआरमध्ये 119 कोटी लोकांचा तपशील नमूद आहे. तर नवा एनपीआर एप्रिल-सप्टेंबर 2020 या कालावधीत केला जाणार आहे.









