वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील मॅनहटन येथे झालेल्या बिग 12 आऊटडोअर ट्रक अँड फील्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा उंच उडीपटू तेजस्विन शंकरने सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत तो कन्सास स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधित्व करीत होता. त्याने 2.28 मी. उंच उडी घेत सुवर्ण पटकावले. या स्पर्धेतील त्याचा हा नवा विक्रम असून या मोसमातील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आणि राष्ट्रीय विक्रम मोडण्यात मात्र तो एका सेंटीमीटरने कमी पडला. 2018 मध्ये त्याने 2.29 मी.चा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. ओक्लाहोमा युनिव्हर्सिटीचा व्हेर्नन टर्नरने (2.25 मी.) रौप्य व टेक्सास टेक युनिव्हर्सिटीच्या जेकान हॉगनने (2.11 मी.) कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत तेजस्विनने मिळविलेले हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. 2019 मध्ये त्याने याआधीचे सुवर्ण मिळविले होते तर मागील वर्षी कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा घेण्यात आली नव्हती. 22 वर्षीय तेजस्विन शंकर 2017 पासून अमेरिकेत असून कन्सास स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा तो अभ्यास करीत आहे.









