सुदिन ढवळीकर यांचे संकेत- थोडे दिवस थांबा..आणि पहा..!
वार्ताहर/ मडकई
भाजपाला धडा शिकवण्यासाठी गोव्यातील जनता सज्ज आहे. त्यासाठी विरोधी पक्षानी एकत्र येण्याची गरज आहे. परंतु भाजपाला शह देण्यासाठी प्रत्येक पक्ष व्यापक दृष्टीने विचार करण्याचे सोडून संकुचिपणे विचार करीत आहे. पक्षाच्या हितापेक्षा जनतेचे हित पाहिल्यास भाजपाच्या हुकुमशाहीला आवर घालता येईल. काही दिवस थांबा आणि मगो पक्षाची भूमिका पाहा, असे संकेत मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिले आहेत.
राजकारणाचे रंग बदलत चालले आहेत. तृणमूल काँग्रेसनेही गोव्यात प्रवेश केला आहे. त्यांचे नेतेही आपल्या संपर्कात आहेत. काँग्रेस नेतेही आपली भेट घेत आहेत. प्रशांत किशोर यांच्याशी होणारी बैठकही उद्या निश्चित झालेली आहे. या पार्श्वभूमिवर गोव्याचे राजकारण एका वेगळय़ाचे वळणावर येऊन ठेपल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. मात्र युतीचा विचार मगो पक्षाने केव्हाच सोडून दिलेला आहे. विरोधी पक्षांमध्ये जसे मतभेद आहेत, तसेच भाजपामध्येही आहेत. भाजपाच्या कोअर कमिटीमधील ज्येष्ठांना बाजूला केले जात आहे. दुखावलेले हे लोक आपल्या संपर्कात आले आहेत. काँग्रेस व भाजपामधेही दुखावलेल्या नेत्यांशी आपली चर्चा मैत्रिपूर्ण नात्याने सुरु असल्याचे गुपितही त्यांनी उघड केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे स्थान कुठे असेल हे जनतेने ठरवून टाकले आहे. त्यावर आपण भाष्य करण्यापेक्षा गोव्यातील जागरूक मतदारच त्यांच्या प्रत्यक्ष कृतीने त्यांना दाखवून देतील. बाकी राहिलेले अस्तित्व आयात केलेले आमदार त्यांना दाखवतील, अशी प्रतिक्रियाही ढवळीकर यांनी व्यक्त केली आहे.









