वार्ताहर /जुने गोवे
गोव्यातील ज्येष्ट साहित्यिक तुळशीदास काणकोणकर यांनी लिहिलेल्या ‘राधा’ या कादंबरीचे प्रकाशन चंपा प्रकाशनतर्फे नुकतेच मळार-ओल्ड गोवा येथील श्री वनदेवी मुकोबा देवस्थानच्या सभागृहात झाले. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, दै. तरुण भारतचे संपादकीय विभाग प्रमुख राजू भिकारो नाईक, वनदेवी मुकोबा देवस्थानचे अध्यक्ष समाजकार्यकर्ते नीळकंठ भोमकर, प्रियांका प्रकाशनचे प्रकाश तळवडेकर, व लेखक तुळशीदास काणकोणकर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी प्राध्यापक अनिल सामंत यांनी ‘राधा’ या कादंबरीवर सुरेखरित्या विवेचन केले. राधा कादंबरीची तुलना प्रा. सामंत यांनी ‘शामची आई’ या पुस्तकाशी केली. मामा-भाचीचे जिव्हाळय़ाचे नाते वाचकमनाला हेलावून जाते. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन या कादंबरीतून निर्माण होतो, असे सामंत म्हणाले.
पुस्तक लिहिणे हे सहज सोपे नसून लेखकाला भरपूर वाचन करण्याची सवय असावी लागते. तुळशीदास काणकोणकर यांनी आतापर्यंत बारा पुस्तके लिहिली असून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाल्याचे रमेश वंसकर म्हणाले.
अनेक साहित्यिकांमध्ये स्वतःच्या मोठेपणा आव आणण्याची सवय असते पण तुळशीदास काणकोणकर हे एक प्रतिभावंत साहित्यिक असूनसुद्धा त्यांच्या कुठेही मिजास नसते. डोंगतील प्रतिभावंत साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांना लिहिते करणारे काणकोणकर यांनी स्वतःचे स्तोम कधी माजवले नाही. तिमिरातील पणती बनून त्यांनी जी साहित्यनिर्मिती केली आहे, ती वाचकाला प्रकाशवाट दाखविणारी आहे, असे प्रतिपादन राजू भिकारो नाईक यांनी केले.
नीळकंठ भोमकर यांनी चांगली कादंबरी लिहिल्याबद्दल तुळशीदास काणकोणकर यांचे अभिनंदन करुन समाज, राज्य किंवा राष्ट्र पत्रकार, शिक्षक व साहित्यिकांमुळे घडते, हे आपण अनुभवलेले आहे. माणसाने वाचन केल्यास तो समृद्ध बनतो. काणकोणकर यांनी यापुढेही लिहित राहून समाजाला मार्गदर्शन करावे. आज समाजाला पैशांपेक्षा पत्रकार, शिक्षक व साहित्यांकाच्या मार्गदर्शनाची अधिक गरज आहे, असेही भोमक म्हणाले. प्रियंका प्रकाशनचे प्रकाश तळावडेकर यांनी आपल्या कवितेचे वाचन या सोहळय़ात केले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे औचित्य साधुन प्रियांका प्रकाशनचे प्रकाश तळावडेकर यांनी श्री वनदेवी मुकोबा चरणी अर्पण केलेल्या पोडियमचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तुळशीदास काणकोणकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सुजाता तुळशीदास काणकोणकर, मुक्ता तुळशीदास काणकोणकर व मनिषा गावडे यांनी पाहुण्यांना पुष्प गुच्छ प्रदान केले. ज्योति तुळशीदास काणकोणकर हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर तुळशीदास काणकोणकर यांनी आभार मानले.









