दगडांमध्ये 400 मकबऱयांची केली होती निर्मिती
तुर्कस्तानच्या पुरातत्व तज्ञांनी दगडांना कापून तयार करण्यात आलेल्या 400 मकबऱयांचा शोध लावला आहे. हे मकबरे सुमारे 1800 वर्षे जुने आहेत. त्यांच्या आत सुंदर भिंतीचित्रे आहेत. तसेच काही बहुमोल वस्तू सापडल्या असून लोक त्यांना खजिना म्हणत आहेत. हे मकबरे रोमन साम्राज्य काळातील दगडांमध्ये कोरीव काम करून तयार करण्यात आल्याचे मानले जातेय.

तुर्कस्तानच्या एजियन सागरापासून सुमारे 180 किलोमीटर अंतरावरील ऐतिहासिक ब्लॉनडोस शहरात हे मकबरे सापडले आहेत. या शहराची निर्मिती अलेक्झांडर द ग्रेटवेळी झाली होती. हे शहर रोमन आणि बिजेटाइन साम्राज्यापर्यंत बहरलेले होते. या गुहांमध्ये सार्कोफॅगी नावाची प्रक्रिया केली जात होती. म्हणजेच यात मारले गेलेले प्राणी आणि माणसांना ठेवले जायचे.
ब्लॉनडोसमधील या मकबऱयांवर परिवारांचे अधिपत्य होते. म्हणजेच एक मकबरा किंवा त्याहून अधिक एखाद्या परिवाराचा तर उर्वरित अन्य कुणाचे असायचे. एखाद्या परिवाराचा कुणी मेल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार येथेच केले जायचे असे तुर्कस्तानच्या युसाक विद्यापीठाचे पुरातत्व तज्ञ बिरोल कॅन यांनी सांगितले.

या ठिकाणी दोन मंदिरे, एक थिएटर, एक सार्वजनिक स्नानगृह, एक व्यायामशाळा, बॅसिलिका, शहराच्या भिंती, मोठा दरवाजा, रोमन साम्राज्याचे नायक हेरून यांची समाधी शोधण्यास पुरातत्व तज्ञांना यश आले आहे.
काही मकबऱयांमध्ये काचा, डायडेम्स, अंगठय़ा, ब्रेसलेट, हेयरपिन, वैद्यकीय उपकरणे, बेल्ट, कप आणि दिवे इत्यादी सामग्री मिळाली आहे. प्रत्यक्षात या गोष्टी मृत्यू झालेल्या व्यक्तीकरता ठेवली जायची. शरीर सोडल्यावरही दुसरा जन्म मिळेपर्यंत लोक परत काही दिवस तेथे घालवतात, अशी मान्यता होती.









