संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा मुद्दा केला उपस्थित
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
पाकिस्तानला हाताशी धरून मुस्लीम देशांचे नेतृत्व मिळवू पाहणारे तुर्कस्तानचे अध्यक्ष रजब तैयब एर्दोगान यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रकरणी आगळीक केली आहे. एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या उच्चस्तरीय सत्रातील स्वतःच्या संबोधनात पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. एर्दोगान यांनी मागील वर्षी देखील एका चित्रफितरुपी संदेशात काश्मीरचा उल्लेख केला होता.
एर्दोगान यांच्या विधानाला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. भारताने एर्दोगान यांचे विधान पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे म्हणत तुर्कस्तानने अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा असे सुनावले होते.
74 वर्षांपासून सुरु असलेल्या काश्मीर समस्येवर संबंधित घटकांमध्ये चर्चेच्या माध्यमातून आणि प्रासंगिक संयुक्त राष्ट्रसंघ प्रस्तावांच्या चौकटीत तोडगा काढण्याची स्वतःची भूमिका कायम ठेवून असल्याचे एर्दोगान यांनी मंगळवारी स्वतःच्या संबोधनात म्हटले आहे. परंतु यंदा एर्दोगान यांच्या काश्मीर विषयक भूमिकेत नरमाई दिसून आली आहे. एर्दोगान यांनी काश्मीरचा मुद्दा अफगाणिस्तान, इस्रायल, सीरिया, लीबिया, युक्रेन, अजरबैजान आणि चीनमधील उइगूर मुस्लिमांच्या नंतर उपस्थित केला आहे.
पाकिस्तानशी जवळीक
पाकिस्तानचा पाठिंबा मिळवू पाहणारे तुर्कस्तानचे अध्यक्ष स्वतःच्या संबोधनात वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत राहिले आहेत. त्यांनी मागील वर्षी पाकिस्तानच्या दौऱयादरम्यान देखील काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. एर्दोगान यांची टिप्पणी इतिहासाची समज आणि कूटनीति देखील दर्शविणारी नाही. या टिप्पणीमुळे द्विपक्षीय संबंधावर प्रतिकूल प्रभाव पडणार असल्याचा इशारा भारताच्या विदेश मंत्रालयाने दिला होता. पाकिस्तानकडून होणाऱया सीमापार दहशतवादाला योग्य ठरविण्याचा तुर्कस्तानचा वारंवारचा प्रयत्न भारताने फेटाळला आहे.
उइगूर, रोहिंग्या मुस्लिमांचा उल्लेख
तुर्कस्तानच्या अध्यक्षांनी मंगळवारी आपल्या संबोधनात चीनमधील अल्पसंख्याक उइगूर मुस्लीम आणि म्यानमारमधील रोहिंग्या अल्पसंख्याकांचाही उल्लेख केला आहे. चीनमधील मुस्लीम उइगूर तुर्कांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासंबंधी अधिक प्रयत्न केले जाण्याची आवश्यकता असल्याचे एर्दोगान म्हणाले. एर्दोगान यांच्या या विधानामुळे चीन नाराज होण्याची शक्यता आहे. रोहिंग्या मुस्लिमांची त्यांच्या मातृभूमीत सुरक्षित, स्वैच्छिक, सन्मानजक वापसी सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचे आम्ही समर्थन करतो असेही त्यांनी म्हटले आहे.
भारताचे चोख प्रत्युत्तर
भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी सायप्रसचे विदेशमंत्री निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक केली आहे. या बैठकीत सायप्रसच्या संबंधी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या प्रासंगिक प्रस्तावांचे पालन करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला आहे. सायप्रस आणि तुर्कस्तानात टोकाचे शत्रुत्व आहे. या पार्श्वभूमीवर सायप्रसच्या विदेशमंत्र्यांशी चर्चा करत भारताने तुर्कस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.









