प्रतिनिधी/ कोयनानगर
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोयना विभागातील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील व्यक्तींबरोबर संवाद साधला. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असा दिलासा त्यांनी दिला.
कोयना परिसरात झालेल्या विक्रमी पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला होता. या प्रलयंकारी पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले. यात कोयना परिसरातील अनेक डोंगर खचून भुस्खलन झाले. यात डोंगर खचून मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावांवर कोसळले. 16 व्यक्तींना आपले प्राण गमावावे लागले. या आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींचे सांत्वन करण्यासाठी व कोयनानगर येथे स्थलांतरीत केलेल्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोयनानगर येथे आले होते. तुम्ही सर्वांनी धीराने रहा, खचून जावू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. बाधित गावांचे उत्तम प्रकारे व सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशिल राहू. पुनर्वसन होईपर्यंत शासकीय निवासस्थाने उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार नरेंद्र पाटील, भरत पाटील, नंदकुमार सुर्वे, धीरज कदम उपस्थित होते. बाधित गावांचे कायमस्वरूपी व सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी आवाज उठवू. तुमच्या सर्व संकटांमध्ये आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. कोणतीही अडचण वाटल्यास रात्री अपरात्री केव्हाही फोन करा. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू, असे त्यांनी सांगितले.
कोयनानगर येथील स्थलांतरित कुटुंबांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हुंबरळी येथील दुर्घटनाग्रस्तभागाची पाहणी केली. नंदकुमार सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. मिरगाव येथील दुर्घटनेची व समस्यांविषयी माहिती पोलीस पाटील सुनील शेलार यांनी दिली.









