हंपीमधील स्मारके पुराच्या विळख्यात : जलाशयाच्या अंतर्गत प्रवाहात वाढ
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी जलाशयामधील पाण्याचा अंतर्गत प्रवाह मात्र कमी झालेला नाही. बळ्ळारी जलाशयात मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून येत असल्यामुळे 14 टीएमसी पाणी विसर्ग केले जात आहे. त्यामुळे हंपी येथील ऐतिहासिक स्मारके पाण्याखाली गेली आहेत.
तुंगभद्रा जलाशयातील पाणीसाठा क्षमता 133 टीएमसी इतकी आहे. जलाशयात 32 टीएमसी इतका गाळ जमा झाला आहे. त्यामुळे पाणीसाठय़ाची क्षमता 101 टक्क्यांवर घसरली आहे. सध्या या जलाशयात 95 टीएमसी पाणीसाठा आहे. जलाशय पूर्णपणे भरण्यासाठी आणखी 6 टीएमसी पाण्याची गरज आहे. जलाशयात दिवसाला 13 ते 14 टीएमसी पाणी वाहून येत असल्याने 33 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
परिणामी हंपी येथील विरुपाक्ष मंदिराजवळील स्नानघाट, पुरंदर मंटप आणि ऐतिहासिक पूल पाण्याखाली गेले आहेत. होस्पेट-गंगावती दरम्यानचा कंप्ली पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरींल वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.









