प्रतिनिधी / पणजी
बंगालच्या खाडीत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेच्या दिशेने सरकत असून गोव्यात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली असून आजपासून पावसाचे पुनरागमन होत आहे. गोव्याच्या सीमेवर कारवार जिह्यात पोहोचलेला मान्सून ‘निसर्ग’ चक्रिवादळामुळे कमकुवत झालेला आहे.
आजपासून पाऊस सुरू होत असला तरी तो मान्सूनमुळेच असे अधिकृतपणे सांगता येणार नाही. पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आजपासून 13 जूनपर्यंत दररोज पाऊस पडेल. या काळात वाऱयाचा वेग थोडा वाढलेला असेल. वीजांच्या गडगडासह राज्यात सर्वत्र पर्जन्यवृष्टी होईल, असे भाकित पणजी वेधशाळेने केले आहे.
वाऱयाचा वेग वाढून प्रसंगी वादळात रुपांतर होईल. वाऱयाचा वेग ताशी 40 ते 50 कि. मी. पर्यंत वाढू शकतो. गेल्या आठवडय़ात निसर्ग चक्रिवादळाच्या प्रमाणामुळे राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस मान्सूनपूर्व गृहित धरलेला होता. आता गेले तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली. आजपासून पाऊस पुन्हा सक्रीय होतोय. गेल्या 24 तासात राज्यात एकूण 12 मि. मी. एवढी पावसाची नोंद झाली. मोसमातील एकूण पाऊस आतापर्यंत 10 इंच झालेला आहे. एव्हाना तो साडेतीन इंच कमी आहे.









