वार्ताहर /किणये
पिरनवाडी भागात अवघ्या तीन तासात एका तरुणाने तब्बल तीन नाग साप पकडले आहेत. सदर घटना सोमवारी दुपारनंतर पिरनवाडी परिसरात घडली असून त्या तरुणाने धाडसाने साप पकडल्यामुळे अनेक जणांचे जीव बचावले. त्या तरुणाचे सध्या पिरनवाडी भागात कौतुक होत आहे.
पिरनवाडी, मारुतीनगर येथे राहणाऱया हणमंत पाटील यांच्या घराच्या बाजुला नाला आहे. त्या नाल्या जवळील गॅलरीत नाग साप आला होता. तो नाग साप पाहून घरच्या मालकासह सगळय़ांचीच धावपळ उडाली होती. यावेळी सर्पमित्र रामनाथ यांना बोलावून घेऊन तो साप पकडण्यात आला. सर्पमित्र गावात आलेच होते. याचवेळी पुन्हा दुसरा फोन आला. साहेब आमच्या घराच्या जवळ बुट ठेवतो. त्या स्टँडजवळच एक साप आहे. मग तेच सर्पमित्र रामनाथ त्या ठिकाणी दाखल झाले. त्या ठिकाणी आल्यानंतर चप्पल बुटच्या स्टँडजवळून साप बाहेर ये-जा करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र अत्यंत चलाखीने रामनाथने त्या सापाला पकडले व संपूर्ण कुटुंबीयांचा जीव भांडय़ात पडला. ही घटना कांबळे यांच्यात घरात घडली. घरातील सर्व सदस्य अत्यंत भयभीत झाले होते. पण साप पकडल्याने सर्वांनी निःश्वास सोडला.
चक्क बागेत साप
पिरनवाडी, शिवाजी मार्ग चौकाच्या बाजूला असणाऱया संजय मोहित यांच्या घरातील बॅगेत साप दिसला. हा प्रकार आणि ते दृष्य पाहून अनेकांची झोप उडाली. कांही जणांना तर बागेत साप हे कृत्य पटत नव्हते. मात्र प्रत्यक्षात पाहिल्यावर प्रत्येकांनी जणू भंबेरीच उडाली. याच बॅगेत असणाऱया सापाला पकडण्याचे धाडस पिरनवाडीच्या सर्पमित्र रामनाथ मुचंडीकर याने केले. आणि त्याने तोही नाग साप पकडला. एका दिवसात अवघ्या तीन तासात तीन नाग साप पकडण्याचे धाडस रामनाथ मुचंडीकर याने केल्याने त्याचे या परिसरात कौतुक होत आहे.









