एकाच कुटुंबातील तिघा जणांचा भीषण खून
प्रतिनिधी/ बेळगाव
दोडवाड (ता. बैलहोंगल) येथे एकाच कुटुंबातील तिघा जणांचा भीषण खून करण्यात आला आहे. रविवारी सकाळी तिहेरी खुनाचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. दोडवाड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
शिवानंद बसवंतप्पा अंदानशेट्टी (वय 60), याची पत्नी शांतव्वा शिवानंद अंदानशेट्टी (वय 40), मुलगा विनोद शिवानंद अंदानशेट्टी (वय 26 तिघेही रा. दोडवाड ता. बैलहोंगल) अशी दुर्दैवींची नावे आहेत. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, आदी वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार 30 जानेवारी रोजी विनोदचे लग्न ठरले होते. लग्नपत्रिका छापून ते वाटण्याचे कामही सुरू होते. घराची रंगरंगोटीही करण्यात आली होती. शनिवारी मध्यरात्री अज्ञातांनी एकाच कुटुंबातील या तिघा जणांचा भीषण खून केला असून या घटनेने सारा परिसर हादरून गेला आहे. खून झालेले शिवानंद हे ता. पं. माजी सदस्य होते. 5 ते 6 जणांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.
शिवानंद, शांतव्वा, विनोद आपल्या घरी झोपले होते. मध्यरात्री तीनच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने व इतर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांचा खून केला आहे. प्राथमिक माहितीनुसार शिवानंद यांच्या घराशेजारी असलेल्या खुल्या जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. मात्र, संशयितांना अटक झाल्यानंतर निश्चित कारण समजू शकणार आहे.
दोडवाड पोलीस स्थानकात भादंवि 302, कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. आर. सरवन्नवर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. शिवानंद यांच्या भावाने एक वर्षापूर्वी त्यांच्यावर खुनी हल्ला केला होता. शिवानंद यांनी दोन लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीने पोलीसात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.