राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची वाटचाल लाखाच्या दिशेने
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात सलग तिसऱया दिवशीही 5 हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत 90,942 रुग्ण आढळले असून रुग्णसंख्येची वाटचाल 1 लाखाच्या दिशेने सुरू आहे. रुग्णसंख्येत महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्लीनंतर कर्नाटकाचा क्रमांक आहे. येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या आणखी वेगाने वाढणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत.
राज्यात शनिवारी कोरोनाचे 5,072 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 2,036 रुग्ण हे बेंगळूर शहर जिल्हय़ातील आहेत. मागील 24 तासांमध्ये 2,403 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 33,750 इतका झाला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 37.1 टक्के आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभरात 73 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 1,796 इतका झाला आहे. सध्या उपचारातील रुग्णसंख्या 55,388 इतकी आहे.
शनिवारी बेंगळूर शहर जिल्हय़ात 2,036, बेळगाव जिल्हय़ात 341, बळ्ळारीत 222, मंगळूर 218, म्हैसूर 187, गुलबर्गा 183, उडुपी 182, विजापूर 175, कारवार 155, बेंगळूर ग्रामीण 154, हासन 151, चिक्कबळ्ळापूर 101, दावणगेरे 79, यादगीर, कोलार व रायचूर जिल्हय़ांमध्ये प्रत्येकी 68, बिदर 62, गदग 61, मंडय़ा 60, बागलकोट 57, हावेरी 52, शिमोगा व चिक्कमंगळूरमध्ये प्रत्येकी 42, कोप्पळ 31, तुमकूर 27, चामराजनगर 22, रामनगर 20, चित्रदुर्ग 16 व कोडगू जिल्हय़ात 9 नवे रुग्ण आढळून आले.









